डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग, 22 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देणार
विद्यापीठातील 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 20 ऑक्टोबरला समुपदेशन फेरी होईल. त्यासाठी 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशाला बुधवारपासून म्हणजेच 20 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. कागदपत्र पडताळणी, समुपदेशन करून प्रवेश निश्चितीसाठी नाट्यगृहात विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 20 ते 22 ऑक्टोबरदरम्यान प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाईल.
65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
विद्यापीठातील 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 20 ऑक्टोबरला समुपदेशन फेरी होईल. त्यासाठी 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पूर्वतयारीसाठी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत सोमवारी महात्मा फुले सभागृहात बैठक झाली. 16 ते 18 ऑक्टोबर आक्षेप, हरकती पदव्युत्तर विभागाने मेलद्वारे स्वीकारल्या गेल्या. आलेल्या 900 तक्रारींचा निपटारा करून अंतिम प्रवेश यादी सोमवारी सायंकाळी संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.
29 ऑक्टोबरला स्पॉट अॅडमिशन
29 ऑक्टोबरला स्पॉट ॲडमिशन घेता येईल. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी 2 हजार 448 जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेसाठी 289 जणांनी नोंदणी केली. मानवविज्ञानच्या अभ्यासक्रमासाठी 846 तर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील अभ्यासक्रमासाठी 463 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे संपर्क कार्यालय सुरु
महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी संस्कृतीची अपरिहार्यता व्यक्त केली होती. याच प्रेरणेतून औरंगाबाद येथे 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच या साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, दीपक बनसोडे, सुमित भुईगळ, मुख्य संयोजक समाधान दहिवाळ, स्वागताध्यक्ष प्रकाश इंगळे, संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य हसन इनामदार, भरत हिवराळे, भूषण चोपडे, स्वप्निल काळे आदींची उपस्थिती होती. महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी संस्कृतीची अपरिहार्यता व्यक्त केली होती. परिवर्तनवादी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांना प्रस्थापित साहित्य व्यवहार समावून घेत नाही. त्यामुळे या समूहातील लेखकांच्या अभिव्यक्तीची गळचेपी होते, त्यांचा आवाज दाबला जातो. म्हणूनच शोषित, वंचित घटकातील लेखकांसाठी स्वतंत्र विचार मंचाची आवश्यकता आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी मांडले.