माळीवाड्यातील पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई, औरंगाबादनंतर नाशिक, गुजरातेतही लूटमार
12 ऑगस्ट रोजी सकाळीच हर्ष पेट्रोलपंप लुटला. त्यानंतर ते नगरला पोहोचले. तेथून पुणे आणि नंतर 19 ऑगस्ट रोजी गुजरातेत व्यारा येथे पेट्रोल पंपावर या चोरट्यांनी लूटमार केली. नंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले. वाटेत सापुतारा डोंगर रस्त्यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवर वापी पोलिसांनी दोघांना पकडले.
औरंगाबाद: शहरातील माळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावर (Harsh Petrol pump) बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखासह दोन जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी घेतला आहे. या टोळीतील दोन आरोपी औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad Police) ताब्यात आहेत तर अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे.
म्होरक्यावर तब्बल 19 गुन्हे दाखल
माळीवाडा येथील पेट्रोल पंप लुटणाऱ्या टोळीचा प्रमुख नवप्रीतसिंग तेरेसमसिंग ऊर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट याच्यावर पंजाबमधछ्ये 19 गंभीर गुन्ह्यांचे खटले सुरु आहेत. त्याचा साथीदार मोहितवर महाराष्ट्रात 6 गुन्ह्यांचे खटले सुरु आहेत. तसेच इतरही अनेकगुन्ह्यांमध्ये हे आरोपी वाँटेड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
12 ऑगस्ट रोजी लुटला होता पेट्रोलपंप
दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा येथील आशिष काळे यांच्या हर्ष पेट्रोल पंपावर 12 ऑगस्ट रोजी नवप्रीतसिंग तेरेसमसिंग ऊर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट ( टोळी प्रमुख वय 36, रा. उमरपूर, अमृतसर, पंजाब), मोहित ऊर्फ मनी विजय शर्मा (वय 30, रा. अमृतसर पंजाब) आणि दिलीप बोरा (रा. अहमदनगर, फरार आरोपी) यांनी सकाळी 9 वाजून 38 मिनिटांनी या पेट्रोलपंपावर लूट सुरु केली. सुरुवातीला पिस्तूलचा धाक दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांकडून पैसे काढले. येथील चार कर्मचारी मोजत असलेले 1 लाख 26 हजार रुपये लुटले होते. त्यावेळी पेट्रोल पंपावर 50 पेक्षा अधिक नागरिक आणि कर्मचारी उपस्थित होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती.
तत्पूर्वी नांदेड, बदनापुरात लूटमार
या दोन्ही आरोपींनी औरंगाबादेत लूटमार करण्यापूर्वी नांदेड येथे बंदुकीचा धाक दाखवत पल्सर गाडी चोरली होती. ती गाडी घेऊन ते बदनापूर येथील एका हॉटेलवर दारू प्यायले. तेथेही बंदुकीचा धाक दाखवून लूटमार केली. 11 ऑगस्टला औरंगाबादेतील एका लॉजवर राहिले. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी सकाळीच हर्ष पेट्रोलपंप लुटला. त्यानंतर ते नगरला पोहोचले. तेथून पुणे आणि नंतर 19 ऑगस्ट रोजी गुजरातेत व्यारा येथे पेट्रोल पंपावर या चोरट्यांनी लूटमार केली. नंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले. वाटेत सापुतारा डोंगर रस्त्यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवर वापी पोलिसांनी दोघांना पकडले. गुजरात पोलिसांकडून औरंगाबाद पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
इतर बातम्या-
Aurangabad gold: सोने-चांदी स्वस्तच, मुहूर्तही खास, गुंतवणुकीची संधी सोडू नका, वाचा औरंगाबादचे भाव