डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्यावर महापालिका सक्रीय, विविध झोनमध्ये स्वच्छता व औषध फवारणीसाठी विशेष मोहिम
शहरातील 9 झोनमधील प्रत्येक झोनमध्ये 3 ते 4 फवारणी कर्मचारी तक्रार निवारण्यासाठी ठेवले जातील. तसेच झोनचे सर्व कर्मचारी एकत्रितपणे मोहिमेसाठी काम करतील. आज बुधवारी 1 क्रमांकाच्या झोनमधून 14 वॉर्डांतील अतिजोखमीच्या विभागात ही मोहीम राबवण्यात आली.
औरंगाबाद: गेल्या आठवड्यापासून औरंगाबाद शहर आणि परिसरात ताप, अंगदुखी, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाच्या ( Dengue, maleria, chikangunia symptoms in Aurangabd) रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पाण्यात डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होत आहे. शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही ताप, अंगदुखी आणि अशक्तपणाची लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शहरात प्रत्येक घरात एक तरी कुटुंब सदस्याला अशी लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे शहरातील जोखिमीच्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे औषध फवारणी केली जात आहे. पुढील दहा दिवस मनपाची ही फवारणी मोहिम चालणार आहे.
अतिजोखिमीच्या भागापासून सुरुवात
15 सप्टेंबर पासून महानगरपालिकेने या औषध फवारणी मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत शहरातील 9 झोनमधील प्रत्येक झोनमध्ये 3 ते 4 फवारणी कर्मचारी तक्रार निवारण्यासाठी ठेवले जातील. तसेच झोनचे सर्व कर्मचारी एकत्रितपणे मोहिमेसाठी काम करतील. आज बुधवारी 1 क्रमांकाच्या झोनमधून 14 वॉर्डांतील अतिजोखमीच्या विभागात ही मोहीम राबवण्यात आली. यात 6236 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून घरांतील 12241 कंटेनर्स तपासण्यात आले. यात 70 दुषित कंटेनर्स आढळून आले. तसेच 59 कंटेनर्स रिकामे करण्यात आले. तर 8614 कंटेनर्समध्ये अबेट ट्रिटमेंट करण्यात आली. या झोनमधील एकूण 2721 घरांमध्ये धूर फवारणी करण्यात आली. व्हेइकल माउंटिंगद्वारे अतिजोखिमीच्या 06 विभागात फॉगिंग करण्यात आले.
अबेट किटकनाशकाची फवारणी
राज्य शासनाकडून मलेरिया विभागासाठी अबेट (120 लि), पॅरेथ्रम (50लि) ही कीटकनाशक औषधी मिळाली आहे. तसेच खासगी एजन्सीकडूनही अबेट (800 लि.) सायफेनोथ्रीन (650लि), बीटीआय लिक्विड (200लि), एमएलओ (700लि) निविदेद्वारे मागवण्यात आली आहे. सध्या मनपाच्या मलेरिया विभागात मुबलक औषधीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे.
जनजागृतीसाठी हस्तपुस्तिकांचे वाटप
घरात किंवा अंगणातील कंटेनर्समध्ये साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. अशा कंटेनर्समधील पाणी काढून ते कोरडे करण्याच्या सूचना महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. तसेच घराभोवती साचलेले पाणी, वाढलेले तण याचा त्वरीत बंदोबस्त करावा, असेही सांगण्यात आले आहे. मलेरिया, डेंग्यू आजाराच्या प्रादुर्भावाच्या संदर्भाने महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी 4340 हस्तपुस्तिकांचे वाटप झाले आहे. तर 1203 घरांमध्ये धुरफवारणी करण्यात आली. काही ठिकाणी आरोग्यसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले.
इतर बातम्या-
Aurangabad Gold: सोन्याचे भाव शंभर रुपयांनी वाढले, जाणून घ्या औरंगाबादेतल्या सराफा मार्केटमधील दर