EV Charging station: औरंगाबादेत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन हवंय? कुठे करणार अर्ज? वाचा सविस्तर!
नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
औरंगाबाद: पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात इलेक्ट्रिक स्टेशन्स (Electric charging station) उभारले जात आहे. ज्या नागरिक किंवा संस्थांनी यासाठी अर्ज केले, त्यांच्या स्टेशनसाठी प्राधान्याने वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शहरातील इच्छुक नागरिकांनी या स्टेशनसाठी अर्ज करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
2025 पर्यंत 25% वाहने इलेक्ट्रिक
राज्य शासनाने आखलेल्या धोरणानुसार, 2025 पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या सहा प्रदूषित शहरांमध्ये किमान 25 टक्के सार्वजनिक वाहने इलेक्ट्रिक असतील. एसटीच्या ताफ्यातील किमान 15 टक्के बस इलेक्ट्रिक असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
प्रति युनिट 4 ते 5 रुपये दर
महावितरण मराठवाड्यातील महामार्गावर हॉटेल्स, पेट्रोल पंप व इतर आस्थापनांच्या मोकळ्या जागेत, शहरातील महत्त्वाच्या जागी चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्रोत्साहन देत आहे. राज्य शासनातर्फे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे. लघुदाब जोडणीसाठी 4 रुपये 12 पैसे प्रतियुनिट व उच्चदाब जोडणीसाठी 4 रुपये 94 पैसे प्रतियुनिट असा दर आकारण्यात येईल.
कुठे करणार अर्ज?
https://evincentive.mahadiscom.in/EVCS/या पोर्टलवर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी अर्जासह संपूर्ण प्रक्रिया करता येईल. वीज जोडणीसाठी महावितरतणच्या http://mahadiscom.in वेबसाइटवर अर्ज करावा, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
इतर बातम्या-