Aurangabad | पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मनपाची धावाधाव, प्रशासकांचा 10 सूत्री कार्यक्रम काय? अंमलबजावणी होणार का?
शिवाजीनगर, सूतगिरणी, पुंडलिक नगर, जुबली पार्क व वेदांत येथील वॉल्व्हवर आणि प्रत्येक टाक्यावर नागरिक मित्र पथकाचे माजी सैनिक पाणीपुरवठाच्या दिवशी उभे राहतील, असे मनपा आयुक्तांनी सांगितले.
औरंगाबाद: शहरात सध्या उन्हाळ्याच्या (Summer) झळा तीव्र असल्याने पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. जिल्ह्यात एवढे मोठे जायकवाडी धरण असतानाही औरंगाबादकरांना आठ ते नऊ दिवसांनी पाणी मिळते. उन्हाळ्यात हा पुरवठा पुरेसा नसल्याचा आरोप करत नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून मोठं जल आंदोलन छेडलं आहे. भाजपच्या नेतृत्वात आतापर्यंत अनेक ठिकाणी आंदोलन (Agitation) करण्यात आले आहे. येत्या 23 मे रोजी स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावरून मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकादेखील धावाधव करत आहे. शहर पाणीपुरवठा वॉर रूम अंतर्गत 9 झोन साठी पालक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 9 पथकं नेमण्यात आले आहेत. यासोबत पाणी वितरण व्यवस्था व पुरवठा, वॉल्व्ह व्यवस्थापन, गळती व्यवस्थापन, आय व्ही आर हेल्पलाईन यांच्यासाठी वेगळे पथक तयार करण्यात आले आहेत. मंगळवारी इंटरव्यू घेऊन तत्काळ एमजेपी व इतर शासकीय व खाजगी कार्यालयाचे अनुभव असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात मनपाचा पाणी पुरवठा विभागात घेण्यात आले. मनपाने ही उपाययोजना केली असली तरीही याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल का असा सवाल जनतेच्या मनता आहे.
मनपाचा 10 सूत्री कार्यक्रम काय?
- प्रशासकीय बदल– पाणीपुरवठा विभागासाठी एक उप आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली. पाणीपुरवठा विभागातील 03 उप अभियंतांऐवजी 04 उप अभियंतांमध्ये शहरातील पाणीपूरवठा विभागण्यात आला आहे.
- प्रधान सचिवांचे निर्देश– महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन कंत्राटी पद्धतीवर नवीन मनुष्यबळ भरती करण्यासाठी सल्ला दिला होता. त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे काही अधिकारी सुद्धा शहराच्या पाणीपुरवठा समस्येवर मात करण्यासाठी मनपाच्या मदतीसाठी तात्पुरते दिले होते. सचिवांच्या निर्देशानुसार शहराचे पाणी परिमाण वाढवण्यासाठी ढोरकिन पंप हाऊस येथे बूस्टर बसवण्याचा प्रस्ताव देण्यात येत आहे. याशिवाय अन्य निर्देशानुसार कार्यवाई तत्काळ सुरू झाली आहे.
- 9 झोनसाठी 9 पथकं– मंगळवारी बैठकीत प्रशासकांनी पाणी पुरवठासाठी 9 झोन मध्ये 9 पथकांची नियुक्ती केली. हे पथक झोनचे पालक अधिकारी च्या मार्गदर्शनाखाली त्या झोनचे पाणी वितरण, वालव्ह व्यवस्थापन आणि पुरवठा आदींवर विशेष लक्ष केंद्रित करतील. पूर्ण शहराचे पाणी वितरण व पुरवठा साठी आयुक्तांच्या जागेवर उपायुक्त संतोष टेंगळे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना जबाबदारी दिली गेली आहे. प्रत्येक झोनचे पथक या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
- गळती शोधणे व थांबवणे– जिथे कुठे पाणी गळती आहे ते शोधून पाणीगळती थांबवण्याच्या जवाबदारी उपायुक्त अपर्णा थेटे दिली गेली आहे. ह्या कामासाठी त्यांना लागणारे मनुष्यबळ पुरवण्यात येतील.
- जायकवाडी पासून सप्लाय यंत्रणेमध्ये सुधारणा– सुचना प्रमाणे महानगरपालिकेच्या जायकवाडी येथील पंपगृहातील पंपाच्या स्टेनरमधील गवत इत्यादीमुळे चोकअप आहे किंवा कसे याची तपासणी पाणबुडयांमार्फत करुन घेण्यात आली आहे. जायकवाडी ते फारोळा या जलवाहीनीवर कर्मचाऱ्यांमार्फत गस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
- सिडको एन-5 टाकी मधून बचत– महानगरपालिके मार्फत खाजगी संस्थाना दिले जाणारे टँकर्स एमआयडीसी च्या एन-1 येथील पंपगृहावरुन भरणा करुन देण्यासाठी एमआयडीसीकडे मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एन-5 जलकुंभ व इतर ठिकाणचे सुमारे 5 लक्ष लिटर्स पाण्याची बचत होणर आहे.
- 24*7 वॉटर सप्लाय वॉर रूम– श्री पाण्डेय ह्यांनी तत्काळ वॉटर सप्लाय वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश दिले. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात स्थित ह्या वॉर रूमच्या द्वारे मुख्यतः वॉटर टाईम टेबलची अमलबजावणी, पाण्याच्या टाकीवर सीसीटीव्ही निगराणी आणि तक्रार निवारणासाठी आय व्ही आर हेल्प लाईन चलवल्या जातील. स्मार्ट सिटीचे फैज अली हे या वॉर रूमचे व्यवस्थापन बघतील.
- एस टी पी चा पाण्याचा वापर– बांधकाम साठी लागणारा पाणी शहराचे मल जल प्रक्रिया केंद्रातून पुरवला जाईल. मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी अफसर सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली सीवेज ट्रीटमेंट प्लांटचा पाण्याचा पुरेपूर उपयोग होत आहे यावर लक्ष देतील.
- पाणी वितरणात महत्त्वाचे बदल– विहीर, बावड्या आणि ट्यूबवेल पाणी नो नेटवर्क एरियामध्ये राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचे मार्ग काढले जातील.. यासाठी मनपा जिल्हाधिकार्यांना विहीरी अधिग्रहीत करण्यासाठी पत्र पाठवणार आहे. ह्या कार्यामध्ये एम जे पी चे कार्यकारी अभियंता अजय सिंग मनपाची मदत करतील आणि शहर अभियंता सखाराम पानझडे लक्ष ठेवतील.
- वॉल्व्ह आणि टाक्यावर सुरक्षा– शिवाजीनगर, सूतगिरणी, पुंडलिक नगर, जुबली पार्क व वेदांत येथील वॉल्व्हवर आणि प्रत्येक टाक्यावर नागरिक मित्र पथकाचे माजी सैनिक पाणीपुरवठाच्या दिवशी उभे राहतील.