Aurangabad | औरंगाबादमधील रस्त्यांची गुणवत्ता तपासणार मुंबई आयआयटीची टीम, लवकरच सर्वेक्षण
रस्ता कशा पद्धतीने बांधला जावा, रस्त्यावर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, हे अहवालात नमूद केले जाईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रस्त्यांचे काम सुरु होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
औरंगाबादः शहरात स्मार्ट सिटीतर्फे (Smart city) 3000 कोटी रुपये खर्च करून 108 रस्त्यांचे काम हातात घेण्यात आले आहे. महापालिका प्रशासकांनी(municipal Administrator) अंदाजपत्राकापेक्षा कमी दराने या रस्त्यांच्या निविदा मंजूर केल्या असल्याने महापालिकेचा खर्च वाचवण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण रस्त्यांच्या गुणवत्तेशी तडजोड होणार नाही, अशी काळजी घेणार असल्याचं महापालिकेनं ठरवलं आहे. या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आयआयटी मुंबईकडे (IIT Mumbai) देण्यात आली आहे. पीएमसी आणि कंत्राटदाराने केलेले रस्त्यांचे डिझाइन आयआयटीकडे पाठवण्यात आले आहे. हे डिझाइन प्रत्यक्षात येऊ शकते का, हे तपासण्यासाठी आयआयटी मुंबईची एक टीम शहरात येणार आहे. प्रत्येक रस्त्याचे सर्वेक्षण करून यासंबंधीचा अहवाल महापालिकेला पाठवला जाईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
ड्रोन व मॅपिंगद्वारे सर्वेक्षण पूर्ण
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने शहरातील 108 रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार ए.जी. कंस्ट्रक्शन कंपनीला काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कंत्राटदाराने ड्रोन आणि गुगल मॅपिंगद्वारे रस्त्याचे सर्वेक्षण करून मोजणी केली. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मुंबई आयआयटीच्या संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प समन्वयक इम्रान खान यांनी दिली.
मेच्या शेवटच्या आठवड्यात काम सुरु
आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानंतर प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी लवकरच एक पथक औरंगाबादेत येणार आहे. रस्ता कशा पद्धतीने बांधला जावा, रस्त्यावर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, हे अहवालात नमूद केले जाईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रस्त्यांचे काम सुरु होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरु होणार
दरम्यान, शहरातील संत तुकाराम नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम या आठवड्यात सुरु होणार आहे. कंत्राटदार एजन्सीने बांधकामाचे संकल्पचित्र तयार केले असून त्याला मान्यताही मिळाली आहे. दोन दिवसात सिडको एन-11 आणि आंबेडकरदर नगरातील हॉस्पिटलचं काम प्रत्यक्ष सुरु होईल. त्यानंतर दोन हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे