औरंगाबादः उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेपूर्वी औरंगाबाद महापालिका (Aurangabad municipal Corporation) प्रशासनातर्फे शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे हर प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामे मार्गी लावली जात आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी नागरिकांचा कोणत्याही स्वरुपातील रोष ओढवून घ्यायचा नाही, याची काळजीही प्रशासनातर्फे घेतली जात आहे. शहरातील सध्या अस्तित्वात असलेली जुनी जलवाहिनी (Water pipeline) जीर्ण झाली आहे. तिच्या डागडुजीची योग्य काळजी घेतली जात आहे तर इकडे संथ गतीने सुरु असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनी टाकण्याचाही श्रीगणेशा करण्यात आला. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून या यंत्राचे पूजन करण्यात आले आणि कामाला सुरुवात करण्यात आली.
औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने 1680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेचे काम सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 2400 मिमी व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. हे विशाल पाइप नक्षत्रवाडी येथील डोंगरावरच तयार करण्यात आले आहेत. आता हे पाइप टाकण्यास सुरुवात झाली आहे. पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पाईप टाकले जात असल्याचे कंपनीचे मुख्य अधिकारी निर्णय अग्रवाल यांनी सांगितले.