मोठी बातमी ! इंदोरीकर महाराजांना दणका, ‘त्या’ विधानावरून कोर्टाचे महत्त्वाचे आदेश; अडचणी वाढल्या
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची चांगलीच कोंडी झाली आहे. एका विधानाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.
औरंगाबाद : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. अखेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार आहेत.
इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत विधान केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा गुन्हा रद्द करावा म्हणून इंदोरीकर महाराज यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. त्यावर सुनावणई झाली असता कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वकील काय म्हणाले?
इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असं विधान केलं होतं. मात्र हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता.
या निर्णयाला याचिककर्त्याने खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळे आता खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया याचिकर्त्यांचे वकील जितेंद्र पाटील यांनी सांगितलं.
प्रकरण काय?
इंदोरीकर महाराज हे मिश्किल, विनोदी आणि उपरोधिक शैलीत कीर्तन करण्यात प्रसिद्ध आहे. शिर्डीत त्यांचं कीर्तन सुरू असताना त्यांनी लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदुरीकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं.
व्हिडीओत काय?
इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यात ते लिंगभेदावर भाष्य करताना दिसत होते. “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं त्यांनी म्हटलं होतं.