औरंगाबादेत चंपा चौकात राडा, हातात तलवार घेऊन वाहनांची तोडफोड, दुकाने बंद करण्याची धमकी!
गुरुवारी रात्री नऊ वाजता चंपा चौकातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरु होती. दुकानात ग्राहकांची गर्दी होती तर रस्त्यावरही अनेक वाहनांची ये-जा सुरु होती. तवेढ्यात पटेल आणि त्याच्या टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
औरंगाबादः शहरातील चंपा चौक परिसरात गुरुवारी रात्री गुंडांनी हातात तलवारी घेऊन काही वाहनांची तोडफोड (Sword attack) केली. खुनाच्या गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेल्या अशफाक पटेल या गुन्हेगाराने दोन ते तीन साथीदारांसह चंपा चौकात हा प्रकार घडवला. हातात तलवारी घेऊन आलेले हे लोक दुकाने बंद करण्याची धमकी देत होते. हातात असलेल्या तलवारींनी ते वाहनांची नासधूस (Aurangabad crime) करू लागले. या घटनेत दोन वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे व्यावसायिकांनी घाबरून दुकाने बंद केली, काहींनी दुकाने तशीच सोडून पळ काढला. या घटनेमुळे गुरुवारी रात्री परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी (Aurangabad police) घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तणाव निवळला, पण शहराती गुंडगिरीनं मर्यादा ओलांडल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले.
काय घडलं गुरुवारी रात्री?
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री नऊ वाजता चंपा चौकातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरु होती. दुकानात ग्राहकांची गर्दी होती तर रस्त्यावरही अनेक वाहनांची ये-जा सुरु होती. तवेढ्यात पटेल आणि त्याच्या टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकाने बंद करण्याच्या धमक्या सुरु केल्या. तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अशोक गिरी, विनोद सलगरकर, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, रोहित गांगुर्डे यांच्यासह दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हे टोळकं निघून गेलं होतं.
आठ दिवसांपूर्वी जामीनावर सुटका
या घटनेतील मुख्य आरोपी अशफाक हा सिटी चौक ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो एका खुनाच्या गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वीच जामीनावर सुटला आहे. दै. दिव्य मराठीतील वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वीच त्याची दुसऱ्या एका टोळीसोबत हाणामारी झाली होती. तेव्हा त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर तो थेट तलवार घेऊन रस्त्यावर उतरला. गेल्या काही दिवसांत शहराच्या विविध भागात गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून नशेखोरीमुळे या घटना घडत आहेत, हे प्रकर्शाने जाणवत आहे.
इतर बातम्या-