औरंगाबादः विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ओमिक्रॉनची बाधा असल्याचे राज्यातील उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद महापालिका शहरात आलेल्या प्रत्येक विदेशी नागरिकाच्या मागावर आहे. मागील 24 दिवसात शहरात 1 हजार 40 नागरिक आले. त्यापैकी 771 प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून 56 जणांचा शोध अद्याप लागला नाही.
शहरात ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून विदेशातून येणारे पर्यटक आणि प्रवाशांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत विदेशातून 1 हजार 40 प्रवासी शहरात दाखल झाले आहेत. त्यापैकी बाहेरदावी गेलेले 31 प्रवासी असून दुबार नावे असलेले 20 प्रवासी आहेत. मनपाच्या वॉर रुममधून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी 107 प्रवाशांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच 56 प्रवाशांचा शोध अद्याप लागला नाही.
आतापर्यंत 771 प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. एक प्रवासी मुंबईतच ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या प्रवाशांसोबत औरंगाबादेत आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तसेच विदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये 33 मुलांचा समावेश आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. तसेच सहा प्रवासी ग्रामीण भागातील असून त्यांचीही चाचणी झालेली नाही. 54 प्रवाशांची चाचणी आणखी सात दिवसांनी करण्यात येणार आहे.
इतर बातम्या-