औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona Vaccination) प्रमाण मागील तीन महिन्यांपासून अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी औरंगाबादेत टास्क फोर्सची तातडीची बैठक आयोजित केली. मात्र या बैठकीला बहुतांश आमदार खासदारांनी सपशेल दांडी मारली. बैठकीला फक्त शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हजेरी लावली. शासन वारंवार लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाला आदेश देत आहे. त्यामुळे या मोहिमेत लोकप्रतिनिधींना सामावून घेत लसीकरण वाढवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला औरंगाबादेत यश येताना दिसत नाहीये. त्यामुळे आता गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या मदतीने लसीकरणाबाबत जनजागृती करत टक्का वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.
पहिला डोस- 29 लाख 52 हजार 972
दुसरा डोस- 21 लाख 68 हजार 530
बूस्टर डोस- 50 हजार 991
एकूण उद्दिष्ट- 34 लाख
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत टास्क फोर्सच्या वेळोवेळी बैठका झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नही केले गेले. मात्र लसीकरण वाढले नाही. याचे खापर लोकप्रतिनिधींनी प्रशासनावरच फोडले. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात असून लसीकरण वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. त्याकरिताच आमदार-खासदारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यालाही बहुतांश सर्वांनीच हरताळ फासला. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या बैठकीत आमदार अंबादास दानवे, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बी.बी. नेमाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी संगिता सानप , संगिता चव्हाण, कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पैठण – फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, घाटी रुग्णालायाच्या डॉ. वर्षा रोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.
– शहरात वॉर्ड, ग्रामीण भागात गावनिहाय लसीकरण वाढवण्यासाठी नगरसेवक , सरपंचांची मदत घेणार
– 30 एप्रिलपूर्वी लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार
– 12 ते 18 वयोगटासाठी विशेष मोहीम, शाळा, गल्ली, गावनिहाय लसीकरणाचा अॅक्शन प्लॅन तयार करून जनजागृती करणार.
– नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यावर भर
इतर बातम्या-