मुलांसोबत सराव करून औरंगाबादच्या श्वेता सावंतने मिळवला महाराष्ट्र क्रिकेट संघात समावेश, अंडर 19 संघात निवड
महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीतर्फे पुण्यात झालेल्या मुलींच्या 19 वर्षाखालील संघ निवड चाचणीत श्वेताने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. श्वेता सध्या 17 वर्षांची असून ती लेफ्टी अटॅकिंग बॅट्समन आहे.
औरंगाबाद: क्रिकेटच्या राष्ट्रीय पातळीवरील 19 वर्षांखालील स्पर्धेसाठी औरंगाबादच्या श्वेता सावंतची (Shweta Sawant, Aurangabad) महाराष्ट्र क्रिकेट संघात नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीतर्फे (Maharashtra Cricket Acadamy) पुण्यात झालेल्या मुलींच्या 19 वर्षाखालील संघ निवड चाचणीत श्वेताने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. श्वेता सध्या 17 वर्षांची असून ती लेफ्टी अटॅकिंग बॅट्समन आहे. औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी क्रिकेट अकादमी आहेत. मात्र येथे प्रशिक्षण घेणाऱ्या आणि सराव करून पुढे जाणाऱ्या मुलींची संख्या फारच विरळ आहे. मग होतकरू खेळाडूंना मुलांसोबत मॅचमध्ये खेळवले जाते. त्यानंतर पुढील स्पर्धांसाठी पाठवले जाते, अशी माहिती श्वेताचे कोच राहुल पाटील यांनी दिली.
मुलांच्या टीममध्येच सराव केला
श्वेता सध्या पुण्यात सराव सामन्यांसाठी गेलेली आहे. तिचे कोच राहुल पाटील यांनी सांगितले की, औरंगाबादमध्ये अनेक अकादमींमध्ये आता मुलींचाही उत्साह दिसू लागला आहे. मात्र अजून त्यांची टीम होण्याएवढी संख्या नाही. त्यामुळे मुलींना मुलांमध्येच खेळावे लागते. त्यांच्यासोबत सरावर करूनच त्या अधिक सक्षम होतात आणि राज्य स्तरीय सामन्यांमध्ये त्या खेळू शकतात. श्वेतानेही इंटर क्लब मॅचमध्ये मुलांच्या टीमकडूनच कामगिरी केली आणि तिचा सराव सुधारत गेला. श्वेतामध्ये खूप गुणवत्ता आहे. ती भविष्यात निश्चितच राष्ट्रीय संघाची सदस्य बनेल. आता महाराष्ट्र संघात निवड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे तिच्याकडे लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया राहुल पाटील यांनी दिली.
वाळूजमधील युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी
श्वेता सावंत गेल्या पाच वर्षांपासून वाळूज येथील युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक राहुल पाटील यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे. राहुल पाटील हे स्वतः लेव्हल 1 चे कोच आहेत. श्वेता सध्या 17 वर्षांची असून ती देवगिरी कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. 19 च्या संघाकरिता निवड चाचणीत औरंगाबादमधील चार मुलींची निवड झाली होती. त्यानंतर धुळ्यातील निवड चाचणीतून त्यातील दोन मुलींची निवड झाली. त्यानंतर पुण्यातील अखेरच्या निवड चाचणीत श्वेता सावंतची निवड झाल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली. (Aurangabad cricketer Shweta sawant has selected for under 19 Maharashtra Cricket team)
इतर बातम्या-