औरंगाबादः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं पक्षातील स्थान अत्यंत डळमळीत झालं असून त्यांचं स्थान नेमकं कुठे आहे, हे त्यांनाच माहिती नाही. या ज्येष्ठ नेत्यावर स्वतःच्या मुलगा, नातवाएवढ्या वयाच्या आदित्य ठाकरे यांच्या चपला उचलण्याची वेळ आली आहे, अशी जहरी टीका मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादमध्ये होऊ घातलेल्या राज ठाकरे यांच्या सभेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना दिलीप धोत्रेंनी अशी टीका केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील, असं वक्तव्य खैरे यांनी केलं होतं. त्याला मनसे दिलीप धोत्रे यांनी मनसे स्टाइलने उत्तर दिलं आहे. औरंगाबादमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक सभा घेतल्या होत्या, त्याच ठिकाणी म्हणजेच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद महापालिकेला यंदा मनसे आव्हान देणार की काय, अशी चर्चा आहे. त्या अनुशंगाने शिवसेना आणि मनसे असा वाद पहायला मिळत आहे.
शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज राज ठाकरे यांच्या सभेबद्दल भाकित वर्तवलं. राज ठाकरे यांच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका मेळाव्यात 300 रुपये देऊन लोक आणले होते. आता तर या भव्य सभेलाही पैसे देऊनच लोक आणले जातील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच हवं तर माध्यमांनी जमलेल्या गर्दीतील लोकांना विचारून याची पडताळणी करावी, असा दावाही खैरे यांनी केला आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या या दाव्याला उत्तर देताना दिलीप धोत्रे यांनी सडेतोड टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ वैफल्यग्रस्ततेतून हे वक्तव्य आलं आहे. खैरे साहेब, तुम्हाला माहिती आहे. या देशात, या राज्यात असा एकमेव नेता राज ठाकरे आहेत. ज्यांच्या सभेला लोकांची गर्दी खेचून आणावी लागत नाही. लोक स्वयंस्फूर्ततेने येतात. तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्या सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं. राज ठाकरे हे राज्यात एकमेव नेते आहेत, ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी पैसे न देता येते. तुम्हाला तुमच्या पक्षात तुमची जागा कुठे आहे, माहिती नाही. तुमच्या मुलाएवढं, नातवाएवढं वय असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या चपला उचलायची पाळी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तरी किमान अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. पहिल्यांदा तुमच्या पक्षातलं स्थान निश्चित करा. ते डळमळीत झालं आहे. असले आरोप करणं बंद करा, हे तुम्हाला शोभणारं नाही, असं दिलीप धोत्रे म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचं प्राबल्य आहे. तर एमआयएम नेहमीच भाजपाची बी टीम असल्याचं बोललं जातं. आता मनसेलादेखील भाजपचं पाठबळ मिळतंय अशी चर्चा सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं इथलं स्थान नगण्य आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मनसे, भाजप, एमआयएम हे एकत्र येत महाविकास आघाडीला तगडं आव्हान देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार चर्चा सुरु आहे.
इतर बातम्या-