Education: राज्यातील कोणत्याही शाळांची वीज कापणार नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं औरंगाबादेत आश्वासन
वीज बिल थकबाकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा आणि इतर कोणत्याही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी दिली.
औरंगाबादः राज्यातील 689 शाळांचे वीजबिल (Electricity Bill) थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल भरल्याचेही राज्य सरकारच्या (Maharashtra Government) वतीने सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात महावितरणकडे बिल भरणा झालेला नाही. तरीही यासाठीची रक्कम देण्यात आली असून त्वरीत वीज जोडणी द्यावी, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. तसेच वीज बिल थकबाकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा आणि इतर कोणत्याही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी दिली. औरंगाबादमधील सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी अभियानातील पहिले पाऊल या राज्यस्तरीय मेळाव्यात त्या बोलत होत्या.
शाळांसाठीचे निर्णय काय?
– या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम देत असून द्विभाषी व इंटिग्रेटेड पुस्तकेही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. आदर्श शाळांतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यावर्षी बदलणार आहेत. – शाळांच्या वीज बिलासाठी मागील वर्षी 07 कोटी रुपये दिले होते. यावर्षी 14 कोटी दिले. ज्या शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तो तत्काळ जोडणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. – मराठवाड्यातील निजामकालीन 488 शाळांसाठी मागील वर्षी 54 तर यावर्षी 300 कोटींची तरतूद केली जाईल. – आदर्श शाळांना निधी प्रदान केला जाईल. – शासकीय शाळांतील 06 हजार पदे भरणार असून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तातडीने करण्याच्या सूचना विभागीय उपसंचालकांना देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
शिक्षणाचा खरा पाया हा बालवयातच मज़बूत केला गेला पाहिजे. तसं जर केलं, तर पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते.चांगली पिढी घड़वायची असेल तर बालशिक्षण आणि मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीनी करणं गरजेचं आहे.याच विचाराने आपण ‘पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतलंय. pic.twitter.com/FnijfKoOjf
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 18, 2022
दहावी-बारावीचे निकाल कधी?
यंदा दहावी आणि बारावी इयत्तेचे निकाल उशीरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. टीईटी संदर्भात पोलिसांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
इतर बातम्या-