औरंगाबादः शहरातील महानगर पालिकेतील नगररचना विभागातील शाखा अभियंता संजय चामले (Sanjay Chamle) याला 3 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने 29 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यानंतर तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच 17 मे रोजी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी त्याला निलंबित केले. विशेष म्हणजे महापालिकेच्या पत्रानुसार, ही कारवाई 30 एप्रिलपासूनच केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी होणार आहे. मात्र महानगर पालिकेत नवी कार्यकारिणी आल्यावर चौकशीतील निकालास आधीन राहून चामलेला पुन्हा सेवेत घेण्याचे प्रयत्न होणार असल्याचे संकेत आहेत.
सातारा परिसरातील लेआऊटच्या तीन संचिका मंजूर करण्यासाठी चामले याने फिर्यादीकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. आता या कारवाईच्या अठकरा दिवसानंतर महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी त्याला निलंबित केले आहे. मंगळवारी त्यांनी यासंबंधातील आदेश काढले. एसीबीकडून चामले याच्यावरील कारवाईचा अहवाल येण्यास उशीर झाल्याने निलंबनाची कारवाई विलंबाने झाल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे.
चामले याने महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या नियम 3 चा भंग केला आहे. त्यामुळे त्याला 30 एप्रिलपासून निलंबित करण्यात येत असल्याचं आयुक्तांनी काढलेल्या पत्रात म्हटलं आहे. निलंबन काळात चामलेचे मुख्यालय शहरच राहिल. मनपा आयुक्तांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित कालावधीत खासगी नोकरी स्वीकारणे किंवा धंदा करण्याची परवानगी राहणार नाही. तसे केल्यास गैरवर्तणुकीबद्दल दोषी ठरवण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, चामले याच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक निलंबित अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून सेवेत घेण्यात आले आहे. चामलेसाठीही तशी व्यवस्था तयार होत आहे, अशी महापालिकेच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.