औरंगाबाद | शहरातील किरकोळ विक्रेत्यांना ठोक दराने गुटखा विक्री (Gutkha selling) करण्यासाठी मागवण्यात आलेला 12 लाख 37 हजारांचा गुटख्याचा साठा औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) जप्त केला. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून मुकुंदवाडी येथील इंदिरानगरात या प्रकरणी छापेमारी करण्यात आली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून शेख हबीब शेख मदन आणि शेख यासीन शेख फत्तू आणि मोहसीन मुमताज खान अशी गुटखा विक्रेत्यांची नावं आहेत. शहरात (Aurangabad city) चोरट्या मार्गाने गुटखा, प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून ठेवल्याची गुप्ता माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी छापा टाकून सदर माल जप्त केला. तसेच हा गुटखा ज्या कारमध्ये टाकला जात होता, ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हा पुरवठा करणाऱ्या जालना येथील पुरवठादाराचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
शहरात छुप्या मार्गाने लाखो रुपये किंमतीचा गुटखा आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मुकुंदवाडी येथील शेख हबीबच्या घरावर छापा टाकला. पोलिस आले तेव्हा आरोपी गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाल्याच्या गोण्या कारमध्ये भरत होता. तसेच एका खोलीत गुटख्याच्या इतर गोण्यांचा ढिगाराही होता. पोलिसांनी हा साठा आणि नऊ लाखांची कार जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत हबीब आणि इतर दोन साथीदारांना अटक केली. हबीब किराणा दुकान चालवत असून त्याने काही महिन्यांपासून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरु केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मुकुंदवाडी येथे पकडलेल्या तीन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली. या आरोपींना जालना येथील अशफाक तांबोळी याने छुप्या मार्गाने गुटख्याचा साठा पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चौकशीतूनही हेच समोर आले. त्यांनी तांबोळी याच्याकडूनच हा माल घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तांबोळीविरोधातही गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु आहे.
इतर बातम्या-