औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, यासंदर्भातील निर्णय औरंगाबादचे पोलीस आयुक्त पुढील दोन दिवसात घेतील, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी केलं आहे. भोंगे, हनुमान चालिसा, रमजान ईद आदी विषयांच्या पार्श्वभूमीवर राज्यात संवेदनशील वातावरण असून औरंगाबादमधील (Aurangabad MNS) राज ठाकरे यांची सभा होणार की नाही असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्पाला पडला आहे. गृहमंत्रालयातर्फे या विषयावर काय निर्णय घेतले जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी पत्राकारांनी गृहमंत्र्यांना याविषय़ी प्रश्न विचारला असता, त्यांनी यासंदर्भातील निर्णय औरंगाबादचे पोलीस घेतील, असे स्पष्ट सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी औरंगाबाद शहरात 09 मे पर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आले आहेत आणि मनसेतर्फे तर 01 मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन केलं जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही, ही उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. जमावबंदी आदेश लागू झाल्यानंतर संबंधित शहराच्या कक्षेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिक एकत्र जमण्यावर बंदी घातली जाते. अशा स्थितीत औरंगाबादमधील मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या भव्य मैदानावर आयोजित सभेला एक लाखाहून अधिक गर्दी होईल, असे दावे मनसेतर्फे करण्यात येत आहेत.
औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळेल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गृहमंत्री दिलीप वळसेपाटील म्हणाले, ‘औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्त यासंदर्भातील निर्णय घेतील. शहरातील स्थिती पाहता पोलीस महासंचालकांशी चर्चा करून पुढील दोन दिवसात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळेल की नाही, याबाबतचा निर्णय पोलीस घेतील. भोंग्यांबाबत सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत जो निर्णय झालाय, तो काल सांगण्यात आला. त्यानंतरही कुणी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असेल तर त्याबाबत स्थानिक पोलीस निर्णय घेतील. तसे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
येत्या 03 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवा, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हा इशारा दिला आहे. मात्र यानुसार राज्यात यापूर्वीच जीआर काढण्यात आला असून कोणतेही भोंगे उतरवले जाणार नाहीत, स्थानिक पोलिसांनी स्थिती बिघडवणाऱ्यांवर कारवाई करावी, असा निर्णय काल झालेल्या सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आजपासून म्हणजेच 26 एप्रिल ते 09 मेपर्यंत औरंगाबाद पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. तरीही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पोलिसांकडून राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळेल, राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या स्थळीच होईल, असा विश्वास मनसेतर्फे व्यक्त केला जात आहे. तर राज्यातील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवरही मनसे ठाम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या-