कामाच्या ठिकाणी हार्ट अटॅक, हा अपघात! विम्याचे पैसे द्या! Aurangabad कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल काय?
कामगार न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निकाल मानला जात आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला विमा कंपनीतर्फे अपघाती विमा असला तरीही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औरंगाबादः एखादा कामगार (Labor) काम करतो, त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका हा अपघातच (Accident) असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा एका खटल्यात करण्यात आला आहे. अर्जदाराचा यासंबंधीचा युक्तिवाद ग्राह्य धरून औरंगाबादेत कामगार नुकसान भरपाई आयुक्त तथा कामगार न्यायालयाच्या (Court) न्यायाधीशांनी आदेश दिले. मृत वाहनचालक साहेबराव सरोदे यांची पत्नी आणि वारसांना ट्रकमालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तिकरीत्या 6 लाख 77 हजार 760 रुपये 12 टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. तसेच ट्रकमालकाला न्यायालयाने 3 लाख 38 हजार 880 रुपये दंड ठोठावला. त्याने सरोदे यांच्या अंत्यविधीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये आमि अर्जाच्या खर्चापोटी 5 हजार रुपये प्रतिवादींना देण्याचाही आदेश दिला.
काय आहे नेमका खटला?
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कामाच्या वेळेत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावलेले साहेबराव सरोदे यांची पत्नी कमलबाई, मुलगा सचिन व मुलगी अश्विनी यांनी ट्रकमालक सुरेश राजपूत व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. लि. विरुद्ध अॅड. संदीप बी राजेभोसले यांच्यामार्फत सादर केलेल्या अर्जाच्या सुनावणीअंती कामगार न्यायालयाने हा आदेश दिला. साहेबराव हे राजपूत यांच्या ट्रकवर चालक होते. त्यांना दरमहा 10 हजार रुपये पगार होता. त्यांना सलग 15 तास ट्रक चालवावा लागत होता. या ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला, असा त्यांच्या वारसांचा दावा होता.
कंपनीचा दावा काय होता?
साहेबराव सरोदे यांचा मृत्यू नैसर्गिक असून तो अपघाती नाही, त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाईसाठी पात्र नाहीत, ट्रकची विमा पॉलिसी अपघातासाठी देण्यात आलेली असून ती नैसर्गिक मृत्यूसाठी लागू होत नाही, असा बचाव विमा कंपनीतर्फे करण्यात आला होता. मात्र याचिकाकर्त्याच्या वारसांकडून करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. कामगार न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निकाल मानला जात आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला विमा कंपनीतर्फे अपघाती विमा असला तरीही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.