Aurangabad: रहिवाशांचा तीव्र विरोध, अखेर किले अर्क परिसरातील 12 घरे जमीनदोस्त, रस्ता रुंदीकरणाची योजना काय?
पुनर्वसनाचे लेखी आश्वासनही मिळाले नाही. दोन टप्प्यांतील ही मोहीम यशस्वी झाली असली तरी मनपाने गरीबांच्या घरावरच हातोडा का मारला, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.
औरंगाबादः शहरातील किलेअर्क परिसरात रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत 40 वर्षांपासूनची 12 घरे अखेर महापालिकेने जमीनदोस्त केली. यापूर्वीच महापालिकेने घरांवरील कारवाईला एकदा सुरुवात केली होती. मात्र रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवल्यामुळे ही कारवाई अर्धवट राहिली होती. मंगळवारीदेखील नागरिकांनी अशाच प्रकारे कारवाईला विरोध केला. मात्र त्यांचा विरोध मोडून काढत पुढील कारवाई करण्यात आली.
गरीबांच्या वस्तीवरच कारवाई का, नागरिकांचा सवाल
या कारवाईतील 80 टक्के घरे मनपाच्याच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आहेत. त्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही. पुनर्वसनाचे लेखी आश्वासनही मिळाले नाही. दोन टप्प्यांतील ही मोहीम यशस्वी झाली असली तरी मनपाने गरीबांच्या घरावरच हातोडा का मारला, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.
महिला, मुले, वृद्धांना चिंता
ही कारवाई सुरु असताना एक महिला जेसीबीसमोर आडवी आली. मात्र महापालिकेच्या पथकाने तिला बाजूला केले. पोलीस पथकाने जेसीबीसमोरून हटवल्यावर महिला, लहान मुले, वृद्ध आपल्या डोळ्यासमोर आपले घर उध्वस्त होताना पाहात होते. चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात आश्रू होते. एवढ्या थंडीत आपण आता कुठे रहायचे, हीच चिंता रहिवाशांना सतावत होती. मनपाने येथील नागरिकांना पुनर्वसनाचे कोणतेही आश्वासन दिलेले नाही.
रस्ता रुंदीकरणाची योजना काय?
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी 1991 च्या विकास आराखड्यात झालेल्या नोंदीनुसार किलेअर्क नौबत दरवाजा ते सिटी चौक, गुलमंडी हा अत्यंत वर्दळीचा आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दिलेल्या 152 कोटींच्या निधीतून नूतनीकरण करण्याचे ठरले आहे. सिटी चौक, रोहिला गल्लीमार्गे किलेअर्क अशी रचना असलेला 100 फूट रुंद रस्ता करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. यासाठी रस्त्यात येणाऱ्या डाव्या बाजूची घरे मनपाकडून पाडण्यात आली.
इतर बातम्या–