शिवसेना नेत्याचा पतंग उंच आकाशात, भाजप नेत्याच्या हाती चक्री, औरंगाबादेत राजकीय पतंगबाजी, चर्चांना उधाण!
भाजप नेत्याने आयोजित केलेल्या या पतंगबाजीच्या कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. यानिमित्त विविध राजकीय चर्चांना मात्र उधाण आले.
औरंगाबादः विविधतेत एकता असा संदेश देणारी आपली भारतीय संस्कृती. सण-उत्सावांच्या निमित्ताने तर सर्व धर्मीय एकत्र येऊन मोठ्या उत्साहात सण साजरे करतात. यात भिन्न विचारधारा असलेले राजकारणीही मागे नाहीत. औरंगाबादेतही संक्रांतीनिमित्त सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येत पतंगबाजीचा आनंद लुटला. भाजप नेत्याने आयोजित केलेल्या या पतंगबाजीच्या कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. यानिमित्त विविध राजकीय चर्चांना मात्र उधाण आले.
भाजप नेत्यातर्फे पतंगबाजीचे आयोजन
औरंगाबादेत शुक्रवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून भाजपचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सदस्य अनिल मकरिये यांनी निवासस्थानी पतंगबाजीचे आयोजन केले. या कार्यक्रमात भाजपचे आमदार अतुल सावे, आ. किशनचंद तनवामी, मनपातील माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भाजयुमोचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींनी अनिल मकरिये यांच्यासोबत पतंगबाजीचा आनंद लुटला.
पतंग चिन्हावरून राजकीय चर्चा!
शिवसेना आणि भाजपने एकत्र येत पतंगबाजीचा आनंद लुटला. ज्या पतंग चिन्हाच्या एमआयएमने लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. तोच पतंग उंच हवेत उडवत, त्याची दोरी आपल्या हाती असल्याचा जणू संदेश देत होते. तर शिवसेनेच्या पतंगाची चक्री आपल्या हाती पकडत भाजप नेते अनिल मकरियेदेखील वेगळेच संकेत देत होते. अर्थ काहीही निघोत, एरवी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन संक्रांतीचा आनंद लुटला, ही बातमी औरंगाबादकरांसाठी सुखावह आहे.
इतर बातम्या-