औरंगाबादः एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सोमवारी एका पत्राद्वारे पक्षाची जिल्हा आणि शहराची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्हाध्यक्ष समीर बिल्डर (Sameer Builder) आणि शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी (Sharek Nakshbandi) यांनी आपले पद सोडून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आदेश खासदारांनी दिले. मात्र पत्रात या दोघांनीही आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या कामाची स्तुतीही करण्यात आली आहे. तसेच पुढील सूचनेपर्यंत जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावे, अशी सूचना खा. जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांच्या या कारवाईनंतर एमआयएम आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अचानकपणे कार्यकारिणी बरखास्त करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, खासदारांच्या या निर्णयानंतर शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने जबाबदारी दिली होती, ती मी चांगल्या प्रकारे निभावली. प्रत्येक पक्षात वेळेनुसार बदल होत असतात. पक्ष जे देईल ते काम करत राहू, आमची कोणतीही नाराजी नाही, असे शहराध्यक्ष म्हणाले. तर जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही.
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयासमोर एमआयएमच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर शांततेत आंदोलन सुरु असतानाच ऐनवेळी एका जमावाने शिरकाव करून हे आंदोलन हायजॅक केले. त्यामुळे अडीच तास तणाव निर्माण झाला. दगडफेक, धक्काबुकीकही झाली. अखेर पोलीस आयुक्त आणि खासदार जलील यांनी रस्त्यावर उतरून जमावाला शांत केले. आंदोलनातले हे टवाळखोर कोण, याचा शोध घेऊ, असं आश्वासन खासदारांनी दिलं होतं. या आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे तर खासदारांनी ही कारवाई केली नाही ना, अशी चर्चा एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये आहे.