औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.मात्र त्यांनी अद्याप त्याला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी टीव्ही9 ला दिली. रमजान ईदची (EID) नमाज होते तेव्हा सर्व अधिकारी येतात, गळाभेट घेतात. ईदच्या शुभेच्छा देतात. मात्र अनेक राजकीय पक्ष तिथे येत नाही. त्यामुळे मी त्यांना स्वतः निमंत्रण देतो.आपण सर्व धर्माचे सण एकत्र साजरे करावेत, असे आवाहन मी केलेय, असं खासदार जलील यांनी सांगितलं.यावेळी बोलताना त्यांनी मनसे, भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. देशात हेट कॅम्पेन सुरु आहे. त्याच्यामध्ये अनेक खेळाडू आहे ज्यात भाजप, शिवसेना आणि आता मनसे उतरली आहे. या तिघांचा हिंदुत्वाचा अजेंडा असून त्यांना एकच पंचिंग बॅग मिळाली आहे, ती म्हणजे मुस्लिम समाज. पण तुम्ही आम्हाला जेवढ्या शिव्या देणार तेवढे आम्ही मोठे होऊ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
रमजान ईदनिमित्त मी सर्व राजकारण्यांना एकत्र येण्याचे निमंत्रण दिले असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘राजकारण हे पाच वर्षासाठी नसते. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगतो की ईद निमित्त आपण सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि गळाभेट करावी. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते की, राजकारण केवळ 6 महिन्यापुरते करायचे आणि साडेचार वर्षे समाजकारण करायचे ही शिकवण तुम्ही बाळासाहेबांकडून घेतली नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका खासदार जलील यांनी केली.
हिंदुत्वावरून सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना खासदार जलील म्हणाले, ‘ देशात हेट कॅम्पेन सुरु आहे त्याच्यामध्ये अनेक खेळाडू आहे ज्यात भाजप, शिवसेना आणि आता मनसे उतरली आहे.तिघांचा अजेंडा एकच आहे.आम्हा तिघांपैकी कोण हिंदुंचा रक्षक आहे ? त्यांना हे दाखवण्यासाठी कुठेतरी एक पंचींग बॅग पाहिजे आणि ते पंचींग बॅग कोण आहे तर मुस्लिम समाज आहे. आम्ही मुस्लिमांना जेवढ्या शिव्या देणार तितके आम्ही मोठे होणार असा त्यांचा समज आहे. म्हणून जे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे त्यात मुस्लिमाचे काही देणे घेणे नाही.मुस्लिमांना ठोका आणि मोठे व्हा अशीच त्यांची समजूत झालीय. मात्र हे जास्तकाळ टिकत नाहीत. लोकांना, युवकांना नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे मात्र यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे केले जाते.’
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना खासदार जलील म्हणाले, ‘कॉंग्रेस ही मेलेली पार्टी आहे. एक म्हण आहे की, खबर मे प्यार लटके हुए.. तर राष्ट्रवादी काय गेम खेळतेय हे सर्वांना माहिती आहे. पुढील काळात आपल्याला कळेल की राष्ट्रवादी कोणाला दाबून किती मोठा होण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. MIM खूप मोठी नाही लहान पार्टी आहे आमची काळजी करु नका.आम्ही सक्षम आहोत.
भाजप शिवसेनेमुळेच एमआयएमला महाराष्ट्रात जागा मिळाली, असे सांगाता इम्तियाज जलील म्हणाले, ‘ तुम्हाला जे करायचे होते ते तुम्ही केले नाही. म्हणून एमआयएमला महाराष्ट्रात जागा मिळालेली आहे. तुम्ही चांगले केले असते तर MIM ला जागा मिळाली नसती. मात्र तुम्ही फक्त मते घेतली आणि विश्वासघात केला. म्हणून MIM ला जागा मिळालेली आहे , अशी टीका खासदार जलील यांनी केली.