Aurangabad | औरंगजेबाच्या कबरीवरून नेत्यांच्या धमकीवजा प्रतिक्रिया, मीही याच शब्दात उत्तर देऊ शकतो, खासदार Imtiaz Jaleel यांचा इशारा काय?
फोनवरून लोकांनी शिवीगाळ केली. अशा फोन कॉलला मी फार महत्त्व देत नाही, मात्र काही नेत्यांनी धमकीवजा प्रतिक्रिया दिल्या. हे गंभीर असून आगामी काळात मी या लोकांना त्यांच्याच शब्दात उत्तर देऊ शकतो, हे ध्यानात घ्यावं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे.
औरंगाबाद : औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Tomb) गेल्यानंतर मला अनेक फोन आले. अनेकांनी धमक्या दिल्या. फोनवरून लोकांनी शिवीगाळ केली. अशा फोन कॉलला मी फार महत्त्व देत नाही, मात्र काही नेत्यांनी धमकीवजा प्रतिक्रिया दिल्या. हे गंभीर असून आगामी काळात मी या लोकांना त्यांच्याच शब्दात उत्तर देऊ शकतो, हे ध्यानात घ्यावं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे. खासदार जलील यांनी 12 मे रोजी तेलंगणाचे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्यासोबत खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून दर्शन घेतलं. त्यानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अत्यंत क्रूरकर्मा असलेल्या औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्रातील नेते झुकूच कसे शकतात, असा सवाल विचारला गेला. शिवसेना, भाजपतर्फे एमआयएमवर सडकून टीका करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार इम्तियाज जलील यांनी आज हा इशारा दिला.
कबरच उखडून टाकण्याची मागणी
दरम्यान, छत्रपती संभाजी राजे यांची क्रूर हत्या करणाऱ्या, तसेच सत्तेच्या आड येणाऱ्या भावालाही जीविनिशी मारणाऱ्या औरंगाबजेब बादशहाचे अनेक पाशवी कृत्य इतिहासात नोंद आहेत. मुस्लीम बांधवदेखील आपल्या मुलाचं नाव कधी औरंगजेब ठेवत नाहीत, मग खासदार इम्तियाज जलीलच तेथे कसे गेले, असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. तर महाराष्ट्रवर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर उखडून का टाकत नाहीत, असा प्रश्न भाजपने केला. राज्य सरकारने ही कबर लवकरात लवकर काढून टाकावी, अशी मागणीही भाजपतर्फे करण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांना खा. जलील यांचं आव्हान
दरम्यान, औंरंगाबादमधील पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात येत्या 23 मे रोजी विराट मोर्चा काढला जाणार आहे. पाणी समस्येवरून भाजप सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरण्याची शक्यता आहे. मात्र बाजप स्वतःदेखील पालिकेत शिवसेनेसोबत सत्तेत होते. त्यामुळे भाजपवरदेखील जनतेचा असंतोष आहे. तुम्ही लोकांमध्ये गेलात तर तुम्हालाही जनता हंड्याने मारेल, असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे.