Aurangabad | मेट्रो नकोय, अखंड उड्डाणपूल मंजूर करा, खासदार इम्तियाज जलील यांच्या लोकसभेत आणखी काय मागण्या?
भाजप नेते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो रेल्वेच्या डीपीआरचे काम सुरु आहे. खासदार जलील यांनी याआधीदेखील मेट्रो रेल्वे प्रकल्पाची शहराला गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं.
औरंगाबादः शहरात रस्ते आणि पाण्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव असताना मेट्रोची (Aurangabad Metro Railway) चर्चा सुरु आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना मेट्रो नकोय तर जालना रोडवरील नगर नाका ते केंब्रिज चौकापर्यंत अखंड उड्डाणपूल (Aurangabad Bridge) तयार करावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी नुकतीच लोकसभेत केली. लोकसभेत नुकतीच 2022-23 या वर्षाच्या रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांबाबत चर्चा झाली. त्यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील रस्त्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात रस्त्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यांच्या बांधकामांची चौकशी करावी, तसेच शहरातील अखंड उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी द्यावी, हे विषय त्यांनी प्रामुख्याने मांडले. भाजप नेते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो रेल्वेच्या डीपीआरचे काम सुरु आहे. खासदार जलील यांनी याआधीदेखील मेट्रो रेल्वे प्रकल्पाची शहराला गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं.
लोकसभेत खासदारांनी कोणते मुद्दे मांडले?
- औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय ज्वलंत विषय म्हणजे, ग्रामीण भागातील निकृष्ट दर्जाचे तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशी करणे आणि अनेक वर्षापासून रखडलेले प्रलंबित रस्ते त्वरीत पूर्ण करण्याची मागणी खासदार जलील यांनी केली.
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आणि केंद्रीय मार्ग निधीतून औरंगाबाद जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता नियंत्रण समिती मार्फत दर्जा व गुणवत्ताबाबत तांत्रिक तपासणी करुन संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
- औरंगाबाद शहराला मेट्रो लाईनची गरज नसून सद्यस्थितीत जालना रोड येथे नगर नाका ते चिकलठाणा अखंड उड्डाणपूल (फ्लायओव्हर) मंजुरी देण्यात यावी.
- औरंगाबाद ते शिर्डी सुपरएक्सप्रेस तयार करण्यात यावी.
- औरंगाबाद – सिल्लोड – अजिंठा महामार्ग काम त्वरीत पूर्ण करावे
- औरंगाबाद पूणे एक्सप्रेसवे आणि कन्नड येथील औट्रम घाटचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.
- महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली.
इतर बातम्या-