कोरोनातील कंत्राटी डॉक्टरांची फसवणूक, मानधन ठरले 50 हजार, महापालिका म्हणते 30 हजारच घ्या
एका डॉक्टरचे थकीत वेतन किमान अडीच ते तीन लाख रुपये असे होत आहे. मात्र केवळ दीड लाखांवर डॉक्टरांची बोळवण करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
औरंगाबाद: कोव्हिडच्या आपत्कालीन काळात स्वतःचा जीव संकटात घालून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची फसवणूक औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad municipal cororation) करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील सहा महिन्यांपासून या डॉक्टरांचे वेतन थकले आहेच. शिवाय करार करताना मनपाने 50 हजार रुपये याप्रमाणे वेतन देण्याचे कबूल केले होते, मात्र आता फक्त 30 हजार रुपयांवर या डॉक्टरांची बोळवण मनपाकडून होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. यामुळे कंत्राटी डॉक्टर (Doctors on contract) आणि कर्मचाऱ्यांचा संताप झाला असून आम्ही कमी मानधन स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
783 डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप अनावर
कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, डाटा ऑपरेटर अशा कर्मचाऱ्यांना मनपाने कंत्राटी स्वरुपात कामावर घेतले होते. मात्र मागील एक महिन्यापासून 783 जणांची सेवा मनपाने थांबवली आहे. या निर्णयाबद्दल डॉक्टरांना आक्षेप नाही. मात्र त्यांचे मागील सहा महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यासाठी त्यांना महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासक पांडेय यांची भेट घेतली होती. तेव्हा 15 दिवसांत पगार होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र अजूनही या डॉक्टरांना वेतन मिळालेले नाही.
मनपा म्हणते, आमच्याकडे अपुरा निधी
कंत्राटी डॉक्टरांमध्ये बीएचएमएस, बीएएमएस आणि डेंटलच्या डॉक्टरांना 50 हजार रुपये मानधन ठरले होते. ऑर्डरमध्ये 50 हजार रुपये मानधनाची नोंददेखील आहे. मात्र आता त्यांना 30 हजार रुपयांवर समाधान माना, असे मनपातर्फे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रुजू झालेल्या काही डॉक्टरांना 50 हजार रुपयांप्रमाणे वेतन अदा केले. मात्र उर्वरीत डॉक्टरांची थकबाकी देताना निधी अपुरा असल्याचे कारण मनपातर्फे दिले जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासानाकडून पुरेसा निधी आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 783 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांची थकीत रक्कम 7 कोटी 35 लाख 35 हजार रुपये आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ 5 कोटी 53 लाख 75 हजार रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे सुमारे 1 कोटी 81लाख 60 हजारांचा फरक आला आहे.
कमी मानधन नको, तिसऱ्या लाटेत फिरकणारही नाही- डॉक्टरांचा इशारा
एका डॉक्टरचे थकीत वेतन किमान अडीच ते तीन लाख रुपये असे होत आहे. मात्र केवळ दीड लाखांवर डॉक्टरांची बोळवण करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. तेदेखील 30 हजारप्रमाणे तीन महिन्यांचाच पगार सुरुवातीला दिला जाणार आहे. मात्र डॉक्टरांनी कमी मानधन स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच तिसऱ्या लाटेत पुन्हा गरज पडली तर आम्ही इकडे फिरणारही नाहीत, असा इशारा डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. शादाब शेख आणि डॉ. मुद्रा निंबाळकर यांनी दिला आहे.
इतर बातम्या-
बाथरूमचा बहाणा करून औरंगाबादच्या बालगृहातून पळाली चार मुले, दहा दिवसातील दुसरी घटना
औरंगाबाद महापालिकेत आता तीन सदस्यीय प्रभाग रचना! तगड्या पक्षांचे फावणार, अपक्षांचा कस लागणार