लसींचे 95 हजार डोस शिल्लक, नागरिकांनी पुढे येण्याची गरज, जनजागृतीसाठी औरंगाबाद मनपाचे व्यापक प्रयत्न
औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनपाने मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. त्यामुळे सीएसआर फंडातून महापालिकेने 1 लाख 15 हजार डोस मिळवले होते. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 95 हजार 420 डोस शिल्लक आहेत. त्यानंतरही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येण्यास तयार नाहीत. अनेकांनी पहिला डोस […]
औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनपाने मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. त्यामुळे सीएसआर फंडातून महापालिकेने 1 लाख 15 हजार डोस मिळवले होते. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 95 हजार 420 डोस शिल्लक आहेत. त्यानंतरही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येण्यास तयार नाहीत. अनेकांनी पहिला डोस घेतलाय. पण दुसऱ्या डोसचा कालावधी लोटला तरीही नागरिक तो घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे शहरात मनपाकडून व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
सध्या 82 लसीकरण केंद्र
राज्य शासनाच्या मिशन कवचकुंडल मोहिमेअंतर्गत शहरात 30 हजार लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे दोन्ही डोस देण्यात आले. मनपाने शहरात एकूण 82 लसीकरण केंद्रे सुरु केली. 10 लाख 55 हजार 600 नागरिकांना दोन डोस देण्याचे उद्दिष्ट मनपाला दिले आहे. 5 लाख 78 हजार 518 जणांनी पहिला तर 3 लाख 36 हजार 516 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 9 लाख 15 हजार 34 एवढी आहे.
आता व्यापक जनजागृती करणार
नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे म्हणून मनपा आता धर्मगुरूंशी चर्चा, मशीदीत नमाज झाल्यानंतर आवाहन, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, घंटागाडीवर आवाहन करणार आहे. नवरात्रीत मंदिरांमध्ये लसीची व्यवस्था करण्यात आली होती. उपवासामुळे अनेक भाविकांनी लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता शहरात होर्डिंग लावून लसीकरणाचा प्रसार केला जाईल, अशी माहिती डॉ मंडलेचा यांनी दिली.
पगार बिलासोबत शिक्षकांना द्यावे लागणार लसीचे प्रमाणपत्र
शिक्षकांना पगार बिल सादर करताना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे आदेश असल्याचे सोमवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता मुलांना शाळेत येताना पालकांचे संमतिपत्र आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे, शाळांचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. मात्र आदेश देऊनही अनेक शिक्षकांचे लसीकरण झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने घेतलेल्या माहितीत दोन हजार शिक्षकांचा लसचा दुसरा डोस बाकी होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण शाळांची संख्या २१३८ आहे, तर विद्यार्थी संख्या २ लाख ६६ हजार ८९ असून शिक्षकांची एकूण संख्या १० हजार ७८३ आहे. शहरातील मिळून एकूण शिक्षक संख्या अठरा हजार आहे. शाळांनी शिक्षकांचे लसीकरण करून घेणेदेखील आवश्यक असल्याचेही गटणे म्हणाले. त्याशिवाय शाळेत येता येणार नाही अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत.
इतर बातम्या-
पुण्यातील ज्येष्ठांची लसीकरणात आघाडी, 64 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस