Aurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी
महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून 63 कोटी 51 लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. या निधीचा विनियोग कसा करायचा याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या नियोजनात आगामी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ई-कार खरेदी करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
औरंगाबाद: येत्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची (Aurangabad Municipal corporation) शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी तयारी सुरु केली आहे. औरंगाबाद महापालिकेवरील आगामी पदाधिकाऱ्यांची वाहने पर्यावरणपूरक असावीत, प्रदूषणमुक्त असावीत, असा प्रयत्न केला जात आहे. तसेच त्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांच्या ई-कार (E-Car) खरेदी केल्या जाणार आहेत. या कारच्या चार्जिंगसाठी (Charging Station) शहरात सात चार्जिंग सेंटरही उभारली जाणार आहेत, अशी माहिती मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.
राज्य व केंद्र शासनाचे प्रोत्साहन
राज्य आणि केंद्र सरकारने प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर करण्याचे संकेत विविध यंत्रणांना दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद भेटीत महापालिकेला ई-वाहने खरेदी करण्याची सूचना केली होती. स्मार्ट सिटी बसच्या ताफ्यात सुरुवातीला किमान पाच ई-बस असाव्यात अशी कल्पना त्यांनी मांडली आहे होती. त्या खरेदी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत, त्यात राज्य शासनाद्वारे मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.
63 कोटी 51 लाख रुपयांचा निधी प्राप्त
महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून 63 कोटी 51 लाख रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. या निधीचा विनियोग कसा करायचा याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या नियोजनात आगामी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ई-कार खरेदी करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
मुख्यालय व स्मार्ट सिटी कार्यालयात चार्जिंग स्टेशन
महापालिकेत नव्याने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी ई-कार उपयोगात येतील, असे पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. ई-कारची किंमत लक्षात घेता पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांच्या कार घेण्याचे निश्चित करण्यात आले आले आहे. तसेच महापालिकेचे मुख्यालय आणि स्मार्ट सिटीचे कार्यालय या ठिकाणी प्रत्येकी एक चार्जिंग स्टेशन असणार आहे. तसेच महापालिका उभारत असलेल्या पाच कंट्रोल पंपावर प्रत्येक एक या प्रमाणे पाच चार्जिंग स्टेशन असतील. सध्या मध्यवर्ती जकात नाक्याजवळ महापालिकेने सुरु केलेल्या पेट्रोल पंपावर ई-वाहनांच्या चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात वाहन खरेदी व चार्जिंग स्टेशनची उभारणी ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे मानले जात आहे.
एसटीपीचे पाणी वीटभट्ट्यांना सक्तीचे करणार-पांडेय
दरम्यान महापालिकेने शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट उभारले आहेत. कांचनवाडी येथे सुमारे 210 एमएलडी क्षमतेचा एसटीपी सुरु करण्यात आला आहे. मात्र त्यातील प्रक्रिया केलेले पाहणी नदीत सोडावे लागते. मात्र आता हे पाणी वीट भट्ट्यांसाठी वापरणे सक्तीचे करणार असल्याचे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काल एका बैठकीत सांगितले.
इतर बातम्या-
Aurangabad Gold: सराफा बाजारात एकदा फेरफटका माराच, सोने-चांदी स्वस्त, नव-नवीन वस्तुंचीही आवक