औरंगाबादः शहरातील घरा-घरांतील कचरा नियमितपणे उचलला जावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा जबाबदार असते. औरंगाबादमधील (Aurangabad city) कचरा संकलनासाठी (Garbage Collection) महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमधील नागरिकांची, घंटागाडी नियमितपणे येत नाही, कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो, अशा तक्रारी असतात. स्मार्ट सिटीच्या (Smart city) वॉर रुममध्ये मागील पंधरा दिवसात अशा बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. मात्र ज्या भागात घंटागाडी नियमितपणे येत नाही, त्या नागरिकांनी पुढे येत महापालिकेकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वॉर रुमच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शहरातील कचरा संकलनाच्या कामाचे खासगीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने हे काम बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. सध्या याच कंपनीकडून घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन होते. हे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी कचऱ्यासंबंधीच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात आहेत. स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये 1मार्चपासून आतापर्यंत नागरिकांनी 60 तक्रारी केल्या आहेत. यात घंटागाडी वेळेवर येत नाही, घंटागाडी आलीच नाही, कचरा पडून आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश आहे.
एखाद्या भागात कचरा पडून असेल किंवा घंटागाडी वेळेवर येत नसेल तर नागरिकांना वॉर रुमकडे तक्रार करता येते. ही तक्रार 8055505002 किंवा 8055128080 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवर तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
स्मार्ट सिटीच्या वॉर रुममध्ये तक्रार दाखल झाल्यावर ती तक्रार रेड्डी कंपनीकडे वर्ग केली जाते. या तक्रारीच्या निवारणासाठी कंपनीला जास्तीत जास्त पाच तासांची मुदत देण्यात आली आहे. या वेळेतच तक्रारीचे निवारण करून संबंधित तक्रारदारास त्याबाबतची माहिती कळवणी कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे घंटागाडीविषयी तक्रार असलेल्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या-