हुश्श! दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह, औरंगाबादला दिलासा, आज आणखी 18 जणांचे अहवाल येणार!
औरंगाबादेत मागील 15 दिवसात विदेशातून आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग सुरु असून त्यापैकी 18 जणांची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज शुक्रवारी येणार आहे. दरम्यान आफ्रिकेतून आलेल्या एका विद्यार्थ्याची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
औरंगाबादः संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Verient) आपल्या भागात शिरकाव होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीसह देशभरातील यंत्रणा खबरदारी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू सर्वप्रथम आढळून आल्याने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतून (African Countries) औरंगाबादेत आलेल्या विद्यार्थ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे मुंबई आणि औरंगाबाद (Aurangabad Airport) विमानतळावर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. तेथे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला दोन्ही ठिकाणहून सोडून देण्यात आले होते. तोपर्यंत त्याला क्वारंटाइन करण्यात आले नव्हते. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानेही त्याची तपासणी केली. तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्याला 4 डिसेंबरपर्यंत फॉरे स्टुडंट्स होस्टेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
आफ्रिकेतील मालावी प्रांतातून आलेला विद्यार्थी
अधिक माहितीनुसार, हा विद्यार्थी आफ्रिकेतील मालावी प्रांतातून 26 नोव्हेंबरला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. तिथे त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला औरंगाबादला येण्याचा परवानगी देण्यात आली. 27 नोव्हेंबरला तो औरंगाबाद विमानतळावर आला. तेथेही त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला सोडण्यात आले होते. मात्र जगभरात अलर्ट जारी केल्यानंतर विमानतळ प्रशासनाने मनपा प्रशासनाला कळवणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. मुंबई विमानतळावरील एका अधिकाऱ्याने विदेशी विद्यार्थी विभागाचे संचालक प्रा. विकासकुमार यांना माहिती दिली होती. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची पुन्हा चाचणी करण्यात आली.
18 जणांचा अहवाल आज येणार
मागील 15 दिवसात विदेशातून आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग सुरु असून त्यापैकी 18 जणांची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज शुक्रवारी येणार आहे. तर तीन जण बाहेरगावी असल्याने त्यांची चाचणी शनिवारी होईल. मागील 15 दिवसांत परदेशातून आलेल्या 32 जणांची औरंगाबाद विमानतळावर नोंद आहे. त्यापैकी 22 जण औरंगाबादचे रहिवासी आहे. त्यांची यादी मिळवून मनपाच्या आरोग्य विभागाने या लोकांशी संपर्क साधून त्यांना चाचणीसाठी आरोग्य केंद्रात बोलावले होते.
इतर बातम्या-