Aurangabad | राज ठाकरेंच्या सभेविषयी दोन दिवसात निर्णय घेणार, औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचं काय वक्तव्य?
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
औरंगाबादःमनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Dr. Nikhil Gupta) यांनी दिली. तसेच शहरात कलम 37 (1) आणि (3) नुसार सुरक्षेच्या कारणास्तव काही आदेश जारी केले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. जवळपास वर्षभर लागू करण्यात येत असतात. आगामी काळातील जयंती तसेच विविध राजकीय सभा (Political parties rally), आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर असे आदेश नेहमीच देण्यात येत असतात. केवळ राज ठाकरे यांची सभा आहे, म्हणून विशिष्ट राजकीय पक्षाला विरोध म्हणून असे आदेश काढण्यात आलेले नाहीत. तर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामान्यपणे कलम 37 (1) आणि (3) नुसार आदेश देण्यात आले आहेत, असा निर्वाळा पोलीस आयुक्ता डॉ. निखिल गुप्ता यांनी केला आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
डॉ. निखिल गुप्ता म्हणाले, ‘ कलम 37 (1) आणि (3) नुसार मुंबई पोलीस हे आदेश वर्षभर काढत असतो. सार्वजनिक ठिकाणी जमाव, शस्त्र बाळगणे यावर नियंत्रण करत असतो. कुठल्याही विशिष्ट कारणांमुळे हे आदेश काढलेले नाहीत. दैनंदिन घडामोडी ज्या घडत असतात, धरणे आंदोलन, मोर्चे सभांचे आयोजन केलेले असते. त्यानुसारच हे आदेश नियमितपणे काढले जातात. तसाच हादेखील आदेश आहे. येत्या 26 एप्रिल पासून 09 मे पर्यंत कलम 37 (1) आणि (3) नुसार आदेश जारी असतील.
कलम 37 (1) आणि (3) नुसारचे आदेश काय?
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार, येत्या दहा दिवसात, संत गोरोबाकाक पुण्यतिथी, संत तुकडोजी महाराज जयंती, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, रमजान ईद, परशूराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, आद्य शंकराचार्य जयंती, रवींद्रनाथ टागोर जयंती, महाराणा प्रताप जयंती आहे. तसेच राज्यात मनसेने आगामी काळात मंदिर-मशीदीसमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. शहरातील लेबर कॉलनीत प्रशासन ताबा घेण्याच्या तयारीत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण संदर्भात विविध राजकीय पक्ष संघटना आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कर वसुलीलाही काही संघटनांचा विरोध होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगबाादेत महाराष्ट्र पोलीस अधीनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे आवश्यक असल्याचे पोलीसांच्या आदेशात नमूद केले आहे.
शहरात कशा-कशावर बंदी?
– या आदेशानुसार, शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या आदी शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बाळगता येणार नाही. – कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही. – दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने बाळगता येणार नाही. – कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही. – जाहीरपणे घोषणा करू नये, गाणे किंवा त्यांच्या ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही, असे ध्वनीक्षेपण करू नये. – तसेच औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अंत्यविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीनुसार घेतलेल्या कार्यक्रमांना लागू होणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.