Aurangabad | ती सर्वांशी बोलत होती, फक्त माझ्याशीच नाही, एकतर्फी प्रेमातून कशीशचा खून करणाऱ्या मारेकऱ्याची आणखी काय कबूली?
कशीशच्या खून प्रकरणी आरोपी असलेला शरणसिंग हा शीघ्रकोपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबादः एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) देवगिरी कॉलेजमधील (Deogiri Collage) विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या शरणसिंग सेठी याला औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Murder) 24 तासाच्या आत अटक केली असून त्याने दिलेल्या कबुलीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. प्रेमाच्या हट्टापायी शरणसिंग सेठी याने सुखप्रीत कौर ऊर्फ कशिश या विद्यार्थिनीची वार करून हत्या केली. त्यानंतर दुचाकी जागेवर ठेवूनच त्याने पळ काढला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलिसांच्या मदतीने शरणसिंग सेठीला चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला होता तर कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात ती इतर सर्व मित्र-मैत्रिणींशी बोलायची, मात्र माझ्याशीच बोलत नाही, हा राग त्याच्या मनात होता.
खुनाच्या दिवशी काय घडलं?
शनिवारी दुपारच्या वेळी कशीश महाविद्यालयात आल्यानंतर शरणसिंग तिच्या मागावर होता. गेटबाहेरील कॅफेमध्ये कशीश मित्र-मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली होती. तो मागेच आला. त्याने काही बोलायचे आहे, अशी शपथ घालून तिला कॅफेबाहेर आणले. तिच्यावर संशय व्यक्त केला. तिच्याशी वादावादी झाल्यानंतर अधिक राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेबाहेर 200 फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढथ नेले. माझी होऊ शकत नाहीस, तर इतर कुणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत शस्त्राने तिच्यावर सतरा ते अठरा वार केले.
हत्येनंतर लपत-छपत धुळे सोलापूर महामार्गावर..
शरणसिंगने हत्या केल्यानंतर दुचाकी सोडून पळ काढला. रस्त्यावर कुणी पाहिल, या भीतीने दाट वस्ती, जंगलातून मार्ग काढत धुळे-सोलापूर हाय वेवर पोहोचला. तेथीन लिफ्ट मागून ट्रकमध्ये बसून नाशिकच्या दिशेने गेला. रविवारी सकाळी 11 वाजता लासलगावला पोहोचला. दरम्यान, शरणसिंगच्या बहिणीच्या घरावर पोलिसांची पाळत होती. शरणसिंग लासलगाव बहिणीच्या घरी आल्यानंतर त्याच्या भाऊजींनी तत्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कळवले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. कायदेशीर पर्क्रिया पूर्ण करून आरोपीला औरंगाबादेत आणले गेले.
शरणसिंगची गुन्हेगारी पार्श्वभूमी
कशीशच्या खून प्रकरणी आरोपी असलेला शरणसिंग हा शीघ्रकोपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानपुरा भागातील काही गुंडांसोबतची त्याची ऊठबस होती. तसेच तो गॅरेजवर कामाला असताना नशापाणी करीत असल्याचे पोलिसांच्या तपात समोर आले आहे.