औरंगाबादः शहरातील फोटोग्राफर्सचे महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन अलिबागला प्रीवेडिंग शूटसाठी गेलेला फोटोग्राफर अचानक गायब झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. या तरुणाने एक नाही दोन नाही तर तब्बल सात जणांचे लाखो रुपये किंमतीचे कॅमेरे भाड्याने घेतले असून त्यांची किंमत जवळपास 14 लाखांच्या घरात जाते. या तरुणाविरोधात मुकुंदवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विशेष म्हणजे ही तक्रार नोंदवण्याच्या एक दिवस आधीच फोटोग्राफरच्या भावाने तो गायब असल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विशाल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश रतन गोत्राळ (वय 27, पुंडलिकनगर) याला अलिबाग येथे लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगची मोठी ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याने छायाचित्रकार विशाल वाघमारे यांचा 1 लाख 35 हजार रुपयांचा कॅमेरा घेतला. तसेच गजानन कचरू वेळंजकर यांचा 3 लाख 40 हजाराचा, सूरजकुमार मनोज इंगळे यांचा 4 लाख 4 हजार रुपयांचा, सोहेल शहा हुसेन शहा यांचा 1 लाख 67 हजार 640 रुपयांचा, श्रेयस लक्ष्मीकांत बुजाडे यांचा 79 हजारांचा, गजेंद्र बाबूराव मते यांचा 1 लाख 60 हजारांचा तर राहुल विजय पवार यांचा 1 लाख हजार रुपयांचा कॅमेरा दीड हजार ते तीन हजार रुपये प्रति दिवस या प्रमाणे भाड्याने घेतला होता.
योगेश गात्राळ याने 24 डिसेंबर रोजी हे कॅमेरे नेले. तसेच 1 जानेवारी रोजी परत आणून देण्याची बोली केली होती. मात्र 3 जानेवारीपर्यंत तो आलाच नाही. विशेष म्हणजे आरोपी योगेश हा सर्व फिर्यादींचा मित्र होता. तरीही अशा प्रकारे फसवणूक झाल्याने सर्वांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, 2 जानेवारी रोजी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपी योगेशचा भाऊ निलेश याने तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर मोठा पेच आहे. मुळात अलिबागला फोटोशूटसाठी निघालेला योगेश तिथे पोहोचला की नाही? पोहोचला असेल तर त्याचा फोन का बंद आहे? 14 लाखांचे महागडे कॅमेरे कुठे आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधून काढायची आहेत.
इतर बातम्या-