Aurangabad | दुचाकी चोराचा शोध घेताना जाळ्यात अडकले मोबाइल चोर, औरंगाबादेत दोन दिवसांपूर्वी चोरलेले 21 फोन जप्त
हे दोन्ही आरोपी चोरलेले मोबाइल विकण्यासाठी ग्राहक शोधत होते. त्यांच्या पाठीवर बॅग होती. पोलिसांनी चौकशी केली असता आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. संशय आल्याने पोलिसांनी त्यांची बॅग तपासली असता त्यात मोबाइल आढळून आले.
औरंगाबादः शहरातील पडेगाव परिसरात मोबाइल शॉपी (Mobile shopee) फोडून लाखो रुपयांचे मोबाइल चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी छावणी पोलिसात (Chavni police) तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलीसांचा तपास सुरु होता. मात्र दुसऱ्याच एका चोरीचा तपास सुरु असताना यापैकी दोन अट्टल मोबाइल चोर (Mobile thief) सिटी चौक पोलिसांच्या हाती लागले. या चोरांनी दोन दिवसांपूर्वी तब्बल 30 फोन चोरले होते. कर्करोग रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना चोरांच्या संशयित हालचाली दिसून आल्यानंतर पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. पोलिसांच्या जाळ्यात हे दोघे अडकले आणि त्यांनी चोरलेले 30 पैकी 21 मोबाइल परत मिळाले. या कारवाईत मोहंमत रईस बोक्या ऊर्फ बोक्या मोहंमद हनिफ (32, पडेगाव) आणि फेरोज खान सुभान खान (34, रा. भोईवाडा) हे त्यांच्या जाळ्यात अडकले.
कसा लागला शोध?
प्रकाश भुजंगराव चेचाडे यांचे पडेगाव मिटमिटा येथील वाणी कॉम्प्लेक्समध्ये साईराज मोबाइल शॉपी नावाने दुकान आहे. 9 मे रोजी रात्री चोरांनी दुकानाचं शटर उचकटून महागडे मोबाइल तसेच इतर साहित्य चोरून नेलं. छावणी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. तर दुसऱ्या एका घटनेत सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे यांनी दुचाकी चोरी संदर्भात कर्मचाऱ्यांना परिसरात साध्या वेशात गस्त घालण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना रईस ऊर्फ बोक्या व फेरोजा खान संशयास्पद हालचाली करताना आढळून आले.
पाठीवर बॅग घेऊन ते इकडे तिकडे फिरत होते…
हे दोन्ही आरोपी चोरलेले मोबाइल विकण्यासाठी ग्राहक शोधत होते. त्यांच्या पाठीवर बॅग होती. पोलिसांनी चौकशी केली असता आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. संशय आल्याने पोलिसांनी त्यांची बॅग तपासली असता त्यात मोबाइल आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी दोन दिवसांपूर्वी पडेगावातून ही चोरी केल्याची कबूली दिली. 30 पैकी 9 मोबाइल त्यांनी विकले होते तर 21 मोबाइल पोलिसांनी जप्त केले.