Samruddhi Highway: लोखंड रात्रीतून चोरून पहाटेपर्यंत विक्री, औरंगाबाद पोलिसांनी रंगेहाथ पकडले
शहरालगत सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाचे लोखंड, महागडे साहित्य चोरून ते भंगारात विकण्याचा प्रताप करणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
औरंगाबादः शहरालगत सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाचे लोखंड, महागडे साहित्य चोरून ते भंगारात विकण्याचा प्रताप करणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी रंगेहाथ पकडले. सलाउद्दीन शहा शाहीद शहा, शेख अरबाज शेख नूर अशा दोघांना पोलिसांनी अटक केली. सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. यात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
चोरी कशी लक्षात आली ?
मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. चिलंलगी रामाणजुला रेड्डी हे या कंपनीचे व्यवस्थापक आहेत. मागील अनेक दिवसांपासून लोखंडी साहित्य चोरीला जात होते, हे कंपनीच्या कर्चमाऱ्यांना लक्षात आले. परंतु त्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे तेवढे लक्ष देण्यात आले नाही. 3 जानेवारी रोजी जोगवाडा हद्दीतील बांधकामाच्या ठिकाणी चिल्लंगी हे कर्मचाऱ्यांसह पाहणी करत असताना काही साहित्य गायब असल्याचे लक्षात आले. यात 80 हजारांचे चॅनल, एक लाखाचे लोखंडी पॅनल, प्लास्टिक ड्रमचे अर्धवट तुकडे, शटरिंग ऑइल असा लाखोंचा माल होता. त्यांनी या प्रकरणी हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पाठलाग करत पकडले
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना एका खबऱ्याकडून हा प्रकार अंबर हिल येथील भंगार विक्रेता करत असल्याची माहिती मिळाली. तसेच अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याचे कळले. पहाटे तीन वाजता ही टोळी रिक्षा घेऊन जायची. त्यानुसार शेळके यांनी पथकासह सकाळी त्यांचा पाठलाग केला. चोरांची ही टोळी ठराविक ठिकाणी जाऊन 300 किलोचे चॅनल, 30-40 किलोचे पॅनल चोरून ते नारेगाव आणि जिन्सीत विकत होते. हा व्यवहार सुरु असताना अरबाज आणि सलाउद्दीन यांना पोलिसांनी पकडले. आरोपींनी असे प्रकार सात ते आठ वेळा केल्याची कबुली दिली.
इतर बातम्या-