औरंगाबादः चिकलठाण्यात होऊ घातलेली रेल्वेची पीटलाईन अचानकपणे जालन्यात होणार, अशी घोषणा रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केल्यानंतर मराठवाड्यात चांगलेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्याला आधीच ड्रायपोर्ट असताना रेल्वेची पीटलाईन तेथे नेण्याची गरज काय, असा सवाल केला जातोय. तसेच औरंगाबादची पीटलाईन जालन्याला वळवणाऱ्या दानवेंवर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीही तोंडसुख घेतले होते. तुम्ही देशाचे मंत्री आहात की जालन्याचे, जालन्याचे असाल तर नगरसेवकाची निवडणूक लढवा, असेही खा. जलील म्हणाले. आता या वादात आणखीच पुराव्यादाखल उतरल्या आहेत, परभणीच्या खासदार फौजिया खान (Faujiya Khan). मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनीच औरंगाबाद येथे रेल्वे पीटलाइनची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने औरंगाबादेतील पीटलाइनला मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंत्री दानवे यांच्या घोषणेला काहीच अर्थ नाही, असं वक्तव्य खासदार फौजिया खान यांनी केलं आहे.
रेल्वे दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त रुळ महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर तयार केले जातात. ज्या ठिकाणी पीटलाइन होते, तेथून जास्त प्रमाणात नव्या गाड्या सुरु होतात. या स्टेशनची कनेक्टिव्हिटी वाढते. दक्षिण मध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्टेशन म्हणून औरंगाबादची ओळख आहे. त्यामुळे रेल्वेची पीटलाइन येथे सुरु झाल्यास सध्या मनमाडला थांबणाऱ्या गाड्या औरंगाबादला थांबतील. येथील नव्या गाड्या सुरु होतील, अशी अपेक्षा होती.
– मराठवाड्यातल लातूर आणि औरंगाबादममध्ये पिटलाइन उभारणी करण्यात यावी, असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना खासदार फौजिया खान यांनी पाठवले होते.
– केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार फौजिया खान, खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून सतत यासाठी पाठपुरावा केला गेला.
– औरंगाबादेतील चिकलठाणा रेल्वेस्थानकावर पीटलाइनची उभारणी करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा प्रस्तावही गेले होते.
– 26 डिसेंबर 2021 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार फौजिया खान यांच्या पत्राला उत्तर देताना, औरंगाबादेतील पीटलाइनसाठी मंजुरी देण्याचेही सांगितले आहे.
– या पत्राच्या सात दिवसांनीच 2 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वेची पीटलाइन जालन्यात होत असून त्यासाठीच्या जागेचा प्रश्न मिटल्याचेही म्हटले आहे.
– औरंगाबादची पीटलाइन अचानक जालन्याला नेण्यावरून सर्वांनाच धक्का बसला.
– आता फौजिया खान यांनी रेल्वेमंत्र्यांचे पत्रच पुराव्यादाखल दिल्यानंतर रावसाहेब दानवे आपल्या घोषणेतून माघार घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार फौजिया खान म्हणाल्या, ‘ रेल्वेच्या बैठकीत औरंगाबादेत व लातूरमध्ये पीटलाइन उभारणीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मी दिले होते. लातूरची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. मात्र औरंगाबादची मागणी मान्य करून तसे लेखी पत्र मला मिळालेले आहे. आता रेल्वे राज्यमंत्री दानवे काहीही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याला अर्थच नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय हा अंतिम समजला जातो. यात कुणाचेही दुमत नसेल’.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2 जानेवारी 2022 रोजी जालन्यातून नांदेड- नगरसोल या नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी रेल्वेची पीटलाइन जालन्यात होत असल्याची घोषणा केली. आता फौजिया खान यांनी सादर केलेल्या या पत्रानंतर दानवे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यामुळे रेल्वे पीटलाइनची जालन्यातील घोषणा ते माघारी घेतात का, हे पहावे लागेल.
इतर बातम्या-