Aurangabad | शिवसेनेला ‘संभाजीनगर’ म्हणू देत, पण औरंगाबादचं नाव बदलणं सरकारचा अजेंडा नाही, राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं…
औरंगाबादेत एका कार्यक्रमासाठी आले असताना राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संभाजीनगरच्या अजेंड्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलवाटोलवीचं राजकारण सुरु आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी नुकतंच यावरून शिवसेनेला डिवचलं. तुम्ही आधी विधानसभेत ठराव मंजूर करून घ्या, केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, मग आम्ही लवकरात लवकर शहराचं नाव बदलून संभाजीनगर करू, असं डॉ. कराड म्हणाले. शिवसेनेचाही (Shiv Sena) गेल्या कित्येक वर्षांचा हा अजेंडा राहिला आहे. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याने शिवसेनेचे हात बांधले आहेत. त्यामुळेच भाजप नेते वारंवार शिवसेनेला यासंदर्भाने आव्हान देत आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या मनात नेमकं काय आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना संभाजीनगरचा मुद्दा मार्गी लागेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याविषयी महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या विषयावर स्पष्टच प्रतिक्रिया दिली. त्यामुळे एकूण चित्रच स्पष्ट होते.
काय म्हणाले राजेश टोपे?
औरंगाबादेत एका कार्यक्रमासाठी आले असताना राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संभाजीनगरच्या अजेंड्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, हा विषय सरकारच्या अजेंड्यावरचा नाही. मुख्यमंत्री संभाजीनगर म्हणतात. त्यांना आनंद असेल तर म्हणू देत. काहीही हरकत नाहीत. पण राज्यात इतरही अनेक प्रश्न आहेत. पाणी, रस्ते, वीजेकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत. त्यामुळे पक्षाचा आणि सरकारचाही हा अजेंडा नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
औरंगजेबाच्या कबरीवर काय प्रतिक्रिया?
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. राजेश टोपे यांनी मात्र या विषयावर बोलणं टाळलं. कुणी कुठे भेट द्यावी, ही त्यांची वैयक्तिक इच्छा आहे. त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. तसं ते वागत असतात. हे माझं वैयक्तिक मत असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
‘संभाजीनगर’वर मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुंबईतील बीकेसी येथील विराट सभेत बोलताना शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ मुद्द्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाषणात बोलताना ते म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शहराला संभाजीनगर संबोधले, तेव्हापासून आम्ही संभाजीनगरच म्हणतो. त्यामुळे कागदोपत्री होवो, अथवा न होवो, आमच्यासाठी हे संभाजीनगरच आहे.