Schools | औरंगाबादमध्ये आजपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू, लसीकरण आणि चाचण्यांचे नियम काय?
सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शंभराच्या आतच नोंदवली गेली. जिल्ह्यात एकूण 84 जण कोरोना बाधित आढळले. तर पाच जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या (Aurangabad Schools in City) हद्दीतील शाळांचे पाचवी ते सातवीचे वर्ग आज मंगळवारपासून सुरु झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहर आणि जिल्ह्यातील सर्वच शाळांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने (Online schools) घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर रुग्ण संख्या आटोक्यात येऊ लागल्याने टप्प्या-टप्प्याने जिल्हा आणि शहरातील शाळा सुरु होत आहेत. त्यानुसार, सोमवारपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून शहरातील पाचवी ते सातवीचे वर्गही सुरु करण्यात येतील, असा निर्णय झाला होता. मात्र गान सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित करण्यात आली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील शाळांनाही सोमवारी सुटी देण्यात आली. आज मंगळवारपासून पाचवी ते सातवीचे वर्ग पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.
शाळा सुरु, नियम कोणते?
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली. त्यासाठी काही नियमदेखील लावण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे- – शाळा सुरु करण्यापूर्वी 48 तासापूंर्वी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची RTPCR चाचणी बंधनकारक असेल, असे महापालिकेने कळवले होते. – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून लेखी संमती घेण्यात यावी. – प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचलक यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. – विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार, टप्प्या-टप्प्याने शाळेत तसेच एका दिवसाआड बोलवावे. – कोरोना नियमांच्या पालनासह शाळेत गर्दी करणे टाळावे.
सोमवारी जिल्ह्यातील कोरोना स्थिती काय?
सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शंभराच्या आतच नोंदवली गेली. जिल्ह्यात एकूण 84 जण कोरोना बाधित आढळले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट पहायला मिळाली. या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र रुग्णांना तीव्र लक्षणे नव्हती. गंभीर बाब ही की, जानेवारी महिन्यात 51 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 39 जण शहरातील आहेत. 1 जानेवारीपासून शहरात कोरोना संसर्ग वाढत गेला. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जाऊन शहराला कोरोनाचा घट्ट विळखा पडला होता. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचे सर्व वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरु असून शहरातील पाचवीच्या पुढील सर्व वर्ग सुरु झाले आहेत. आता फक्त पहिली ते चौथीचे वर्ग कधी सुरु होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या-