औरंगाबादः पांढऱ्या, पिवळ्या पट्टेरी वाघांसाठी औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाची (Siddharth Garden) ख्याती आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून लोक येथील प्राणी संग्रहालयातील (Aurangabad Zoo) प्राणी आणि विशेषतः वाघांचे दर्शन घेण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून येथील वीर नावाच्या पांढऱ्या वाघाची (White Tiger) प्रकृती अचानक खालावली आहे. शनिवारपासून त्याने स्वतःहून अन्न पाणी घेणे बंद केले आहे. सध्या त्याला केअर टेकरच्या हाताने खाद्य भरवले जात आहे. अत्यंत अशक्त प्रकृती झाल्याने वीर वाघाच्या आरोग्य तपासण्यादेखील करण्यात आल्या. मात्र त्याचे सर्व अहवाल नॉर्मल असल्याचे आढळून आले आहे. आज त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात एकूण 12 वाघ आहेत. त्यापैकी नऊ वाघ पिवळ्या रंगाचे तर तीन वाघ पांढऱ्या रंगाचे आहेत. तीन पांढऱ्या वाघांपैकी दोन मादी आणि एक नर आहे. त्यापैकीच वीर हा शनिवारपासून आजारी आहे. प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी वीरची प्रकृती अशक्त असल्याचे लक्षात आले. तीन चार दिवस आधीपासून त्याने खाणे-पिणे बंद केले होते. त्यामुळे तो अशक्त झाला आहे. त्याला उठून बसणेही अशक्य होऊ लागले. त्यानंतर व्यवस्थापनाने आरोग्य पथकाला बोलावून घेतले. येथील कंत्राटी डॉ. नितीसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले आहेत.
राज्यातील इतर प्राणी संग्रहालयांचा विचार करता औरंगाबादेत वाघांचा जन्मदर सर्वाधिक आहे. मात्र सध्याच्या प्राणी संग्रहालयात त्यांच्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण प्राणी संग्रहालयच स्थलांतरीत करण्याची योजना आखली आहे. मिटमिटा येथील सफारी पार्कवर भव्य प्राणी संग्राहलयाची ही योजना असून तेथे प्राण्यांना राहण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
इतर बातम्या-