औरंगाबाद स्मार्ट सिटी बससेवेची जबाबदारी 56 माजी सैनिकांवर, वाचा किती बस कोणत्या मार्गांवर सेवा सुरू?
मनापाचे प्रशासक तथा स्मार्टी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून माजी सैनिकांच्या हाती ही सेवा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबादः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील दोन पेक्षा जास्त महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबादमधील स्मार्ट सिटी (Aurangabad smart city) बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. स्मार्ट सिटी बस या आधीपासूनच एसटी महामंडळाचे चालक आमि वाहक यांच्या मार्फत चालवण्यात येत होती. मात्र एसटीचे कर्मचारी संपावर (ST Strike) गेल्यापासून ही सेवाही बंद पडली होती. स्मार्ट सिटीच्या वतीने 56 माजी सैनिकांवर बस चालक व वाहकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बससेवा सुरळीत होण्याचा हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात 5 मार्गांवर 11 बसेस दोन पाळीत सोडल्या जात आहेत. 23 जानेवारी या स्मार्ट सिटीच्या वर्धापनदिनापासून या सेवाला प्रारंभ झाला आहे.
एसटी बससेवा हळू हळू सुरु, सिटी बसही होणार
मागील 77 दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने शहराबाहेरील बसची जी परिस्थिती होती, तीच शहरांतर्गत बससेवेची होती. ही सेवाही एवढे दिवस ठप्प होती. आता एसटीचे काही कर्मचारी कामावर रुजु होत आहेत. काही मार्गावर एसटी बससेवाही सुरु झाली आहे. मात्र सिटी बससेवा सुरु होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी मनापाचे प्रशासक तथा स्मार्टी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून माजी सैनिकांच्या हाती ही सेवा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या पाच मार्गांवर सेवा सुरू?
शहरातील स्मार्ट सिटी बससेवा सिडको- टीव्ही सेंटर- रेल्वेटेशन औरंगपुरा- मध्यवर्ती बसस्थानक-रांजणगाव सिडको- रांजणगाव-घाणेगाव सिडको- रांजणगाव- जोगेश्वरी चिकलठाणा- सिडको, महावीर चौक, मोरे चौक-रांजणगाव
15 वर्षे चालकपदाचा अनुभव असलेल्यांकडे जबाबदारी
मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, 15 वर्षे चालकपदाचा अनुभव असलेल्या माजी सैनिकांकडे सिटी बसचे स्टिअरिंग सोपवण्यात आले आहे. वाहकांची जबाबदारीही माजी सैनिकांकडेच सोपवण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशसेवेचा गौरव प्राप्त झालेल्या अनुभवी सैनिकांचे अनुशासन व कार्यक्षमतेचा लाभ होईल. या सेवेचा विस्तार कसा होईल, यावर काम सुरु असल्याचेही आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उपव्यवस्थापक मुकुल देव आणि सिद्धार्थ बनसोड यांच्या देखरेखीखाली 56 चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
इतर बातम्या-