Aurangabad: सोयगाव नगराध्यक्ष पद एसटी महिला प्रवर्गासाठी, आशाबाई तडवी यांची वर्णी लागणार का? उत्सुकता शिगेला
नगराध्यक्षपद एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 17 मधून निवडून आलेल्या एकमेव एसटी प्रवर्गाच्या महिला नगरसेविका आशाबाई तडवी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. यानंतरही आणखी काय सूत्र हलतात, अध्यक्ष व नगराध्यक्षपद कुणाकडे येते, यासंबंधीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
औरंगाबादः राज्यातील 139 नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat Election 20222) अध्यक्षपदांसाठी सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या सोडतीमध्ये 139 नगरपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 नगराध्यक्षांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमधील अनुसूचित जाती वा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार, अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यानुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायत (Soygaon Nagar Panchayat) अध्यक्षपदाची आरक्षण सोडतही मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात काढण्यात आली. या सोडतीत नगराध्यक्षपदासाठी एसटी महिला प्रवर्गाला (ST Woman Category) लॉटरी लागली आहे. सोडतीची माहिती तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे.
दोन टप्प्यांत निवडणूक
औरंगाबाद जिल्ह्यात केवळ सोयगाव नगरपंचायतीसाठी यंदाची निवडणूक झाली. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडली. 21 डिसेंबर आणि 18 जानेवारीला यासाठी मतदान घेण्यात आले. सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायतीवर शिवसेनेचे स्पष्ट बहुमत आले. 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हे पद एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
अध्यक्षपदावर कुणाची वर्णी?
भाजपकडे सहा जागा आल्याने सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याचे चित्र आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेच्या ताब्यात राहतील. निवडीची औपचारिकता तेवढी बाकी आहे. आता नगराध्यक्षपद एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 17 मधून निवडून आलेल्या एकमेव एसटी प्रवर्गाच्या महिला नगरसेविका आशाबाई तडवी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. यानंतरही आणखी काय सूत्र हलतात, अध्यक्ष व नगराध्यक्षपद कुणाकडे येते, यासंबंधीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इतर बातम्या-