औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद (ZP Election) आणि पंचायत समिती गण रचनेचा निवडणूक विभागाने सादर केलेला प्रारुप आराखडा सदोष असल्याने हा आराखडा नव्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) जिल्हा प्रशासनाला हे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे गट, गण रचनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना (ZP Officials) हाताशी धरून राजकीय स्वार्थापोटी मनासारखी रचना व्हावी, यासाठी धडपड करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना चपराक बसल्याची चर्चा सुरु आहे. आता गट आणि गण रचनेचा नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांची पंचवार्षिक मुदत 20 मार्च रोजी समाप्त झाली. जिल्हा परिषदेचेचे 8 गट आणि पंचायत समित्यांमध्ये 16 गणांची वाढ करण्याचा निर्णय मार्च महिन्यात राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या 70 तर पंचायत समित्यांमधील गणांची एकूण संख्या 140 झाली आहे.
सुरुवातीला सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती. औरंगाबादसह राज्यातील 25 जिल्हा परिषदा आमि 284 पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गट आणि गण रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा अंतिम असेल, असे वाटत होते. जिल्हा निवडणूक विभागाने हा कच्चा प्रारुप आराखडा 8 मे रोजी निवडणूक विभागाकडे सादर केला होता. मात्र हा आराखडा अमान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आधी मनासारखा आराखडा तयार करण्यासाठी राजकीय नेत्यांनी केलेले प्रयत्न पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. आता गट आणि गण रचनेचा आराखडा नव्याने तयार केल जाईल.