Aurangabad | औरंगाबादकरांनो, शहर स्वच्छ ठेवले तरच अमृत योजनेचा निधी, नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात अडथळ्याची शक्यता!
महापापिलका आणि महाराष्ट्र जीवर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दररोज येणाऱ्या पाण्यात 11 एमएलडी ची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
औरंगाबादः पाणी प्रश्नाने (water issue) पेटलेल्या औरंगाबादकरांना आता नवी पाणीपुरवठा (Water Supply Scheme) योजना कधी पूर्ण होतेय, याचीच प्रतीक्षा आहे. जीर्ण झालेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतूनच विविध उपाययोजना करीत महापालिका प्रशासक शहरवासियांच्या (Aurangabad city) समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शहरातील 1680 कोटींची नवी पाणीपुरवठा योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरु आहे. ही योजना आणि सातारा देवळाईसाठीच्या ड्रेनेजलाइन योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून निधी मिळावा, यासाठी स्थानिक प्रसासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार, शहराचे रँकिंग चांगले असेल तरच या योजनेचा निधी मिळू शकेल. त्यामुळे आता मनपा प्रशासन व नागरिक स्वच्छतेबाबत किती जागरूक राहतात, यावर निधीचे भवितव्य अवलंबून असेल.
पाणी योजनेच्या बजेटमध्ये 400 कोटींची वाढ
राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवटा योजना मंजूर केली आहे. या योजनेचं काम सुरु झालं आहे, मात्र अत्यंत संथ गती असल्यामुळे योजना रखडतेय, तसा खर्चही वाढतोय. लोखंड आणि इतर साहित्याचे भाव वाढल्याने योजनेच्या खर्चात नुकतीच 400 कोटींची वाढ झाली आहे. मात्र निधीअभावी योजना रखडू नये, राज्य शासन व महापालिकेवरील बोजा कमी व्हावा, यासाठी केंद्राच्या अमृत-२ योजनेत तिचा समावेश करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
पाणी समस्या सोडवण्यासाठी आणखी काय हालचाली?
- -शहरातील पाणी प्रश्नाची दाहकता कमी करण्यासाठी हिमायतबाग येथील ऐतिहासिक शक्कर बावडी व इतर दोन विहिरींतूनही पाणी उपसा करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
- हे पाणी रोजाबाग येथील सेल्टिंग टँकमध्ये घेऊन शहरातील काही वसाहतींना पुरवले जाणार आहे.
- हर्सूल तलावातून 4 ते 5 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचं काम सुरु आहेय
- जायकवाडीच्या पंपहाऊसमधील एक पंप बदलून तिथे नवीन पंप बसवण्यात आला. त्यामुळे तिथूनही पाच एमएलडी पाणी वाढले.
- हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडी आणि इतर दोन मोठ्या विहिरींना मुबलक पाणी आहे. तेथूनही पाणी घेण्याचं ठरलं आहे. यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
- पाणी टंचाई कमी करण्यासाठी प्रशासकांनी प्रत्येक प्रभागासाठी एक पालक अधिकारी नियुक्त केला आहे.
- अधिकारी पथकामुळेच सिडको एन5 आणि एन 7 जलकुंभावरील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
- महापापिलका आणि महाराष्ट्र जीवर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दररोज येणाऱ्या पाण्यात 11 एमएलडी ची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.