औरंगाबाद जिल्ह्यात फेरफारची प्रक्रिया रखडली, जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्काळ कारवाईच्या सूचना
औरंगाबादः अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल राज्यमंत्री असताना औरंगाबाद जिल्ह्यातील महसूल विभागाचा कारभार अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचे उघड झाले आहे. औरंगाबादच्या ग्रामीणमध्ये तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या कासवगतीमुळे जमिनीचे 14,220 फेर रखडले आहेत. याची गंभीर दखल घेत कारवाईची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे. यापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्याचा […]
औरंगाबादः अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल राज्यमंत्री असताना औरंगाबाद जिल्ह्यातील महसूल विभागाचा कारभार अत्यंत संथ गतीने सुरु असल्याचे उघड झाले आहे. औरंगाबादच्या ग्रामीणमध्ये तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या कासवगतीमुळे जमिनीचे 14,220 फेर रखडले आहेत. याची गंभीर दखल घेत कारवाईची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे. यापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्याचा परिणाम झाला नाही, हे विशेष.
ग्रामीण भागात फेर प्रक्रियेला प्रचंड महत्त्व
ग्रामीण भागात फेर ही प्रक्रिया महत्त्वाची असते. जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद तलाठ्याने सातबारावर करण्याच्या प्रक्रियेला फेर म्हटले जाते. त्यात मालकी हक्काच्या क्षेत्रफळाचीही माहिती असते. जमिनीवर विहीर, बोअर असल्याचे तेही लिहिले जाते. कर्ज गहाणखत केले असेल तर त्याचा बोजा टाकण्यासाठीही फेर घेतला जातो. त्यामुळे जमीन व्यवहारात, विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेत फेर प्रक्रियेला प्रचंड महत्त्व आहे. त्यात मोठी आर्थिक उलाढालही होते. तलाठी, मंडळ अधिकारी मोठ्या प्रमाणावर वाटाघाटी करत असतात. त्यातूनही प्रक्रिया लांबत जाते.
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक फेर प्रलंबित
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक 3244 फेर प्रलंबित आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद तालुक्यात अधिक उलाढालीमुळे हा आकडा दिसत आहे. फेराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येत आहे. त्यांना गती वाढवण्याची सूचना केली आहे. शिवाय काही गावात शिबिरेही होणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, शिबिरे घेऊन प्रकरणे निकाली काढण्याची सूचना केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे तहसीलदारांना बजावले आहे.
इतर तालुक्यातही फेर प्रक्रिया रखडलेलीच
राज्यमंत्री सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यात 1826 तर रोहयोमंत्री संदिपान भुमरेंच्या पैठण तालुक्यात 2844 फेर रखडले आहेत. वैजापूर – 206, गंगापूर – 1478, कन्नड -1331, फुलंब्री – 545, खुलताबाद – 478, सोयगाव – 454. फेर प्रलंबित आहेत. तलाठी संघाच्या राज्यस्तरीय आंदोलनामुळे फेर घेण्याची प्रकरणे तुंबली आहेत. पंधरा दिवसांची नोटीस आणि त्यानंतरचा कालावधी पाहता साधारण चार आठवड्यांत फेर घेणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. आता अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाचे काम तलाठ्यांना करावे लागले. त्यात फेर आणखी लांबण्याची चिन्हे आहेत.
इतर बातम्या-