आगे दंगा चालू है…म्हणत भामट्यानं वृद्धेला थांबवून अंगावरचं सोनं पळवलं, औरंगाबादेत कुठे घडला प्रकार?
पुढे दंगा सुरु आहे, मोठा राडा झालाय, तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढून माझ्याकडे द्या, अशी थाप मारत वृद्ध महिलेच्या गळ्यातली सोन्याची पोत चोरट्याने काढायला लावली. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास औरंगपुरा भागात ही घटना घडली.
औरंगाबादः काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला थांबवत आम्ही पोलीस आहोत, अंगावरचे दागिने काढून सुरक्षित खिशात ठेवा, असे सांगून लुटल्याचा प्रकार घडला होता. त्याच गुन्ह्यासारखा आणखी एक प्रकार औरंगाबाद शहरात (Aurangabad city) सोमवारी घडला. पुढे दंगा सुरु आहे, मोठा राडा झालाय, तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढून माझ्याकडे द्या, अशी थाप मारत वृद्ध महिलेच्या गळ्यातली सोन्याची पोत चोरट्याने काढायला लावली. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास औरंगपुरा भागात ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिटी चौक पोलीस (Aurangabad police) त्याचा शोध घेत आहेत.
घटना काय घडली?
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडूबी रज्जाक शेख या शेतमजुरी करून उदर निर्वाह करणाऱ्या 65 वर्षीय महिला आहे. त्या पैठण तालुक्यातील लहुगाव येथे राहतात. त्यांना रऊफ आणि आरेफ ही दोन मुले असून बिल्कीस नावाची एक मुगली आहे. रऊफ हा गंगापूर इथं तर आरेफ हा अंबरहिल, जटवाडा रोड येथे राहतो. मुलगी बिल्कीस हिचे लग्न झालेले असून ती तिचे पती रोजाबाग ईदगाह परिसरात राहतात. सोमवारी कडूबी या मुलगा आरेफ आणि बिल्कीस यांना भेटण्यासाठी लहुगाव येथून औरंगाबाद येथे दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास आल्या. त्यानंतर आरेफला भेटून त्या दुपारी दीडच्या सुमारास मुलगी बिल्कीस हिला भेटण्यासाठी अंबरहिल येथून रिक्षाने रोजाबाग ईदगाह मशिदीजवळ उतरल्या. तेथून पायी जात असताना एकजण दुचाकीवर जवळ आला. तो कडूबी यांना म्हणाला पुढे दंगा सुरु आहे. तुमच्या गळ्यातील सर्व दागिने माझ्याकडे द्या.
ते तुम्हाला मारून टाकतील, म्हणत घाबरवले
कडूबी यांनी सदर इसमाला दागिने देण्यास नकार दिला. मी तुला ओळखत नाही असे म्हटले. मात्र भामट्याने कडूबी यांना म्हटले, मी तुम्हाला ओळखतो. पुढे दंगा सुरु आहे, ते तुम्हाला मारून टाकतील. तुम्हाला शॉर्टकटने पाहिजे तिथे सोडतो, असे म्हणत त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची पोत, मोबाइल आणि पिशवी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर कडूबी यांना दुताकीवर घेऊन औरंगपुऱ्याकडे निघाला. दुचाकीवर जाताना त्याने मी बालवाडीचे रेशन वाटण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच लहुगाव येथे असल्याने तुम्हाला ओळखतो असे म्हटले. औरंगपुरा येथे कडुबी यांना एका टपरीवर चहासाठी उतरवले. कडूबी चहाचा ग्लास घेत असतानाच नजर चुकवून त्याने तेथून धूम ठोकली. कडूबी यांनी आरडाओरडा केली, मात्र भामटा तेथून क्षणात पसार झाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत, सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात चोरटा कैद झाला असून पोलीस त्याचा शोध गेत आहे.
इतर बातम्या-