औरंगाबादः वाळूज येथील प्रलंबित जलकुंभाच्या (Water Tank) बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या जलकुंभासाठी जमीन कोणती मिळणार, ही अडचण अनेक दिवसांपासून होती. मात्र आता त्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी गट क्रमांक 340 मधील 12 गुंठे जागा वाळूज ग्रामपंचायतीला बहाल केली आहे. तसाच अंतिम आदेश त्यांनी 22 डिसेंबर रोजी काढला. त्यामुळे आता वाळूजमधील नवीन जलकुंभाचे काम लवकरच सुरु होईल, अशी आशा आहे.
उद्योगनगरी वाळूजमध्ये लोकसंख्याही भरपूर आहे. विशेष म्हणजे मुबलक पाणी असूनही केवळ जलकुंभ नसल्याने सध्या 12 दिवस पाण्याची वाट पहावी लागतके. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने संबंधितांकडे नवीन जलकुंभाचा प्रस्ताव दिला होता.
तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने येथील पोलीस कॉलनी जवळील जागेवर दोन वर्षांपूर्वी विनापरवानगीने जलकुंभाचे बांधकाम सुरु केले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सदरचे बांधकाम पोलीस कॉलनीच्या जागेत येत असल्याचे सांगून बांधकाम बंद पाडले होते. त्यानंतर आता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून जागेचा हा तिढा सोडवण्यात यश मिळवले आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जलकुंभासह अभ्यासिका केंद्रास 12 गुंठे जागा ग्रामपंचायतीला दिली आहे. त्यामुळे लवकरच त्या जागेवर नियोजित जलकुंभ अद्ययावत केला जाणार आहे.
इतर बातम्या-