गळ्यात माळा टाकल्यानंतरही तिनं स्पष्ट नकार दिला, आत्तेभावाशी नातं जोडलं, औरंगाबादच्या लग्नातल्या धिंगाण्याची गोष्ट चर्चेत!
चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली. पण नवरीचे लग्न मोडल्याने नातेवाईक चिंतेत होते. इतर नातेवाईकांच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता नवरीच्या आत्याच्या मुलाशी तिचे लग्न लावले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
औरंगाबादः मुलाकडून आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी लग्नात गोंधळ घातल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. औरंगाबादेतही (Aurangabad marriage)असाच प्रकार घडला. दारू पिऊन आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडी मंडळींनी लग्न मंडपात खूप धिंगाणा घातला. वऱ्हाडातील तरुण मंडळींनी गावकऱ्यांशीच वाद घातले. वाहनांची तोडफोड केली. एवढंच नाही तर नवरदेवानंही वऱ्हाडी मंडळींना साथ दिली. नवरीशी (Bride) लग्न करण्यासच नकार दिला. गावकऱ्यांनी कशी बशी विनंती करून नवरा-नवरीचं लग्न लावलं. पण एवढं करूनही नवऱ्याचे नखरे थांबतच नव्हते. मग काय नवरीनं हे लग्नच नाकरलं. गावकऱ्यांसमोर मोठी पंचाईत झाली. अखेर नवरीच्या आत्तेभावाशी नातं जोडायचा निर्णय झाला आणि आणखी एकदा लग्न लागलं. औरंगाबादमध्ये मुंबईतून (Mumbai) आलेल्या या वऱ्हाडाच्या गोंधळाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
कुठे घडला प्रकार?
औरंगाबादेतील गांधेली येथील लग्नात बुधवारी हा प्रकार घडला. मुंबईतून आलेल्या वऱ्हाडी मंडळीतील अनेकांनी दारू प्यायली होती. विक्रोळीतून हे वऱ्हाड दुपारी साडेबाराच्या सुमारास आले. नवरदेवाची वरात निघणार तोच मुंबईच्या मित्रांनी गोंधळ सुरु केला. ते गावकऱ्यांचं ऐकतच नव्हते. दुपारचे तीन वाजले तरी लग्न लागले नव्हते. वऱ्हाडींनी लग्नात येथेच्छ गोंधळ घातला. अखेर नवऱ्याने लग्नालाही नकार दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी मनधरणी करून कसेबसे लग्न लावले.
आत्याच्या मुलासोबत लग्न
लग्नात झालेला हा राडा पाहून वधू दुःखी झाली होती. कसेबसे लग्न लागले. मुलीच्या पाठवणीची वेळ आली तरीही नवरदेव आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ सुरूच होता. अखेर नवरीनेच अशा नवऱ्यासोबत नांदण्यास नकार दिला. त्यामुळे मुंबईच्या वऱ्हाडींना फटके मारत पाठवून देण्यात आले. चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली. पण नवरीचे लग्न मोडल्याने नातेवाईक चिंतेत होते. इतर नातेवाईकांच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता नवरीच्या आत्याच्या मुलाशी तिचे लग्न लावले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.