Aurangabad | औरंगाबाद जिल्हा परिषद निडणुकीचा बिगुल वाजला, गटांची संख्या आता 70, येत्या 27 जूनला अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार
जिल्हा परिषदेप्रमाणेच काल औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. यावर विविध राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
औरंगाबादः आगामी निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या (Aurangabad ZP) गट आणि गणांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. गुरुवारी तो प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार जिल्हा परिषदेतील गटांची संख्याही आता 62 वरून 70 वर पोहोचली आहे. तसेच जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) गणांची संख्या आता 140 झाली आहे. यात सिल्लोड (Sillod) तालुक्यातील गटांची संख्या दोनने वाढली आहे. तर खुलताबाद आणि सोयगाव या तालुक्यात एकही गट वाढलेला नाही. इतर तालुक्यात एक-एक अशी गटांची संख्या वाढली असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 23 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे हा आराखडा सादर केला. 31 मे पर्यंत विभागीय आयुक्तांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर 02 जून रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 08 जूनपर्यंत या आराखड्यावर हरकती आणि सूचना मांडण्याची मुदत असेल.
08 जून पर्यंत हरकतींसाठीची मुदत
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीप्रमाणे 31 मे रोजी या प्रारुप आराखड्याला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मान्यता दिली आहे. या आराखड्यावर 02 जूनपासून हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती द्याव्या लागणार आहेत. 08 जूनपर्यंत हरकती व आक्षेप नोंदवता येतील. 22 जूनपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांनर सुनावणी देऊन विभागीय आयुक्तांकडून गण रचना अंतिम करण्यात येईल. त्यानंतर 27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर राजकीय पक्षांचे आक्षेप
दरम्यान जिल्हा परिषदेप्रमाणेच काल औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. यावर विविध राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अनेक वसत्या आणि कॉलन्यांचे नव्या वॉर्ड रचनेत तुकडे करण्यात आल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आपण नेमक्या कोणत्या वॉर्डात येतोय, यावरून नागरिकांचाही गोंधळ उडालेला दिसतोय. काही राजकीय पक्षांच्या दबावाखाली अशी रचना केल्याचा आरोपही केला जातोय. विविध पक्षांचे नेते प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवणार आहेत.