जरी भरला अथांग नाथसागर, तरी आमची रिकामी घागर… समाज माध्यमांवर औरंगाबादकरांचा संताप
जायकवाडी भरले तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनी पाणी येते. पुन्हा आठवडाभर पाणी येत नाही म्हणून घरात पाण्याची साठवण करावी लागते. या साठवणुकीमुळेच विविध भागातील नागरिकांना आजारांना तोंड द्यावे लागते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
औरंगाबाद: आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेले जायकवाडी धरण (Jayakwadi dam) पूर्णपणे भरल्याच्या वृत्ताने काल मराठवाड्यात आनंदी आनंद होता. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याआधी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil chavan) यांच्याहस्ते जलपूजनदेखील करण्यात आले. मात्र धरणातील पाण्याचा संचय करणारा नाथसागर भरला तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनीच पाणी येते, या भावनेने औरंगाबादकरांनी समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
महिला व तरुण समाजमाध्यमांवर व्यक्त
जायकवाडी धरणातून बुधवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर शहारतील पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग होण्याचे छायाचित्र शेअर करीत महिला व तरुण मंडळींनी पाणीपुरवठ्यावरचा राग व्यक्त केला. ‘तू कितीपण भरला तरी औरंगाबादला 6 दिवसांनीच पाणी येणार’ अशी प्रतिक्रिया देत मनपाच्या कारभारावर टीका करण्यात आली.
धरण भरले तरी काय उपयोग?
जायकवाडी धरण बरले तरी औरंगाबादला 6 दिवसांनीच पाणी येणार असेल तर आम्हाला त्याचा फार आनंद नाही. शहरातील नळांना दररोज किंवा एका दिवसाआड पाणी मिळत नाही, हे पाणीपुरवठा विभागाचे अपयश आणि औरंगाबादकर म्हणून आमचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया एका नागरिकानी व्यक्त केली.
घरात शिरणाऱ्या पाण्याचं काय करायचं?
नाथसागर भरल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. मात्र तेथील पाण्याचे पूजन करतानाच घरात पाणी शिरल्याने शहरातील अनेक वस्त्यांचे काय हाल झालेत, याकडेही महानगरपालिकेने पहावे, अशा प्रतिक्रियाही माध्यमांतून उमटल्या.
पाणी साठवणुकीमुळेच आजारांना आमंत्रण
जायकवाडी भरले तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनी पाणी येते. पुन्हा आठवडाभर पाणी येत नाही म्हणून घरात पाण्याची साठवण करावी लागते. या साठवणुकीमुळेच विविध भागातील नागरिकांना आजारांना तोंड द्यावे लागते. किमान एक ते दोन दिवसाआड शहरातील नळांना पाणी येईल, अशी व्यवस्था महानगरपालिकेने करायला हवी, अशा प्रतिक्रियाही शहरात उमटल्या.
आज दुसऱ्या दिवशीही धरणातून विसर्ग
दरम्यान, तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणातून आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारीदेखील पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याने उग्र रुप धारण केले आहे. पैठणच्या प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात गोदावरीचे पाणी शिरले असून नाथसागरासमोरील दक्षिण जायकवाडीला जोडणारा छोटा पूलही पाण्याखाली गेला आहे. गोदावरी नदीच्या खवळलेल्या पाण्याने गोदाकाठच्या गावांच्या सीमेवर धडक मारली आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, पैठणच्या नाथसागराच्या दहा ते सत्तावीस पर्यंतचे दरवाजे प्रत्येकी तीन फुटांनी उचलून 56,592 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी झाली असून त्यानुसार विसर्ग कमी केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या-