बीडः मुलांच्या डोळ्यांवर, शरीरावर, अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आई-वडील मुलांना गेम खेळू देत नाहीत. मात्र गेमची मनातून आवड आणि जन्मजात असलेले बिझनेसमनचे गुण यातून बीडच्या अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने एक नाही दोन नाही तर तीन-तीन गेम लाँच (Video Game Launch) करण्याची किमया करून दाखवली. आर्यन कुटे (Aryan Kute) असे या मुलाचे नाव असून बीडमधील (Beed) एका कार्यक्रमात आर्यनच्या तिसऱ्या गेमचे विजयादशमीच्या निमित्ताने नुकतेच लाँचिंग झाले.
अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून बालपणी आई-वडील गेम खेळू देत नव्हते. पण गेमची आवड असल्याने अवघ्या दहाव्या वर्षी बीडच्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे व अर्चना कुटे यांचा मुलगा आर्यनने गेम तयार करण्याची संकल्पना मांडली अन् पालकांच्याच मदतीने अडीच वर्षांपूर्वी ओएओ इंडिया ही आयटी कंपनी स्थापन केली. कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला कृष्णा माखन मस्ती व त्यानंतर इंडियन फूड बाश हे दोन गेम लाँच केले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आता ‘राइज ऑफ वॉर’ हा तिसरा गेम तयार करत जगभरात याचे लाँचिंग बीड येथील कार्यक्रमातून करण्यात आले.
13 वर्षीय आर्यन सध्या सातवीत शिकतो. दहा वर्षांचा असताना शाळा संपली की तो घरी थांबण्यापेक्षा आईबरोबर तिरुमला कंपनीत जात असे. आई सतत कंपनीच्या मीटिंगमध्ये व्यग्र असायची. कंपनीतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे आई ज्या पद्धतीने प्रतिनिधित्व करते ते पाहून स्वत:ची एक कंपनी असावी असे आर्यनला वाटायचे. त्यामुळे गेम तयार करण्याची संकल्पना त्याने पालकांसमोर मांडली व हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने आई-वडिलांच्या मदतीने पुणे येथे ओएओ इंडिया ही आयटी कंपनी स्थापन केली. या माध्यमातून त्याने सुरुवातीला “कृष्णा माखन मस्ती’ आणि इंडियन फूड बाश हे दोन गेम लाँच केले. याला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. या यशानंतर त्याने आता “राइज ऑफ वॉर’ हा तिसरा गेम तयार केला. हा गेम सुरुवातीला थायलंडमध्ये लाँच केला. परंतु भारतात याचे लाँचिंग झाले नव्हते. शुक्रवारी बीडमध्ये हा त्याचा तिसरा गेम जगभरात लाँच झाला.
तिसरा गेम तयार करण्यासाठी आर्यनला एक वर्ष लागले. आर्यन म्हणतो, ताणतणाव घालवण्यासाठी या गेमच्या माध्यमातून काही वेळ करमणूक होऊ शकते का? आपला ताण घालवू शकतो का? असा विचार माझ्या मनात आला आणि त्या भूमिकेतून आम्ही आबालवृद्ध खेळू शकतील असे गेम तयार केले. तिसऱ्या गेममधील स्टोरीमध्ये सस्पेन्स आहे. आर्यन सुरेश कुटे हा सध्या त्याच्या ओएओ इंडिया कंपनी मॅनेजिंग डायरेक्टरपदावर आहे.
आर्यनचे आजोबा स्व. ज्ञानोबाराव कुटे यांनी 1950 मध्ये राधा क्लॉथ्स नावाने बिझनेस सुरु केला. त्यानंतर आर्यनचे वडील सुरेश कुटे यांनी कुटे ग्रुपची स्थापना केली आणि त्यानंतर कुटे ग्रुपचा विस्तार अधिक जोमाने होत गेला. ग्रुपच्या विविध कंपन्याही स्थापन झालेल्या आहेत. आर्यनची आई अर्चना कुटे या सध्या कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आर्यनच्या संकल्पनेतून गेमची नवी कंपनी स्थापन करण्यात आल्याची माहिती सुरेश कुटे यांनी दिली.
इतर बातम्या-
भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल
Business Ideas: चार लाखांच्या भांडवलात ‘हा’ व्यवसाय सुरु करा; महिन्याला बक्कळ पैसा कमवा