खैरेंनी नाला आणि कचरा साफ करण्यासारखी छोटीमोठी कामं केली, भागवत कराडांचा पलटवार
चंद्रकांत खैरे माझ्यावर आरोप करतात, पण खैरे हे दिल्लीत कधीच रमले नाहीत, ते औरंगाबाद म्हपालिकेतच गटार साफ करण्यासारखी छोटी छोटी कामं करत राहिले, अशी टीका भागवत कराड यांनी केलीय.
औरंगाबाद : भागवत कराड यांना आणखी दिल्ली कळलेलीच नाही, दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केलेलं आहे. भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कुण्याही बँकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातलं आहे, ते काहीही करू शकत नाहीत, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी डॉ. भागवत कराड यांच्यावर केली होती, त्यानंतर केंद्रीय मंंत्री भागवत कराड यांनी खैरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
कराडांचा खैरेंवर पलटवार
चंद्रकांत खैरे माझ्यावर आरोप करतात, पण खैरे हे दिल्लीत कधीच रमले नाहीत, ते औरंगाबाद म्हपालिकेतच गटार साफ करण्यासारखी छोटी छोटी कामं करत राहिले, चंद्रकांत खैरे 50 किलोमीटर वरून साधं पाणी आणू शकले नाहीत, पण मी मात्र श्रीगोंदा इथून औरंगाबादसाठी गॅस पाईपलाईन आणली आहे. ती 130 किलोमीटर शहरात फिरवणार आहोत असा पलटवार भागवत कराड यांनी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातलं राजकारण पुन्हा तापले आहे.
औरंगाबादेत मेट्रोची मागणी करणार
पिटलाईन औरंगाबाद शहरात यावी यासाठी मी प्रयत्न केले, पण दानवेसाहेब रेल्वे मंत्री झाले आणि पिट लाईन जालन्याला गेली. पण ते औरंगाबादला पिटलाईनसाठी नाही म्हणाले नाहीत, त्यामुळे औरंगाबादसाठी सुद्धा दुसरी पिटलाईन होऊ शकते, असेही कराड म्हणाले आहेत. औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे चालू करावी यासाठी मी मागणी करणार आहे. मेट्रो कधी येईल हे माहिती नाही मात्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.